Do Canadians support Khalistani supporters know the Survey details
ओटावा: भारताने अनेकवेळा कॅनडामधील खिलस्तानी हालचालींविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारत सरकार सातत्याने कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारकडून खलिस्तानी गटांविरुद्ध कठोर कारवाईची देखील मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून कॅनडाच्या नागरिकांची खलिस्तान चळवळीबाबतची मानसिकता समोर आली आहे. यामध्ये कॅनडियन लोकांचा खलिस्तानी चवळींना पाठिंब्याबद्दल माहिती समोर आली आहे.
कॅनडाच्या नागरिकांची भूमिका
लेगर 360 या संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, असे आढळून आले आहे की 72% कॅनडियन नागरिकांनी खलिस्तानी आंदोलनासारख्या फुटीरतावादी गटांविरुद्ध कठोर धोरणे लागू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, 54% लोकांनी या खलिस्तानी चळवळींना विरोध दर्शवला आहे. यामुळे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते की, बहुतांश कॅनडियन नागरिक खलिस्तानी हालचालींना समर्थन देत नाहीत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जावे, अशी त्यांची मागणी आहे.
शीख समुदायावर परिणाम आणि जनतेची प्रतिक्रिया
सर्वेक्षणात शीख समुदायांवरील नकारात्मक परिणामांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. यानुसार, 30% लोकांनी शीख समुदायाला खलिस्तानी हालचालींमुळे अनावश्यक चौकशीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे तर 33% नागरिकांनी या गोष्टीला नकार दिला असून, 37% लोकांनी अनिश्चित असल्याचे म्हटले आहे.
ओंटारियोमध्ये खलिस्तानी हालचालींचे स्वरूप
कॅनडामध्ये ओंटारियो हे प्रांत खलिस्तानी हालचालींचे मोठे केंद्र मानले जाते. तरीदेखील, सर्वेक्षणानुसार, ओंटारियोमधील फक्त 11% नागरिकांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे. 2021 च्या जनगणनेनुसार, ग्रेटर टोरोंटो भागात मोठ्या प्रमाणावर शीख लोकसंख्या आहे. विशेषतः ब्रॅम्पटन शहरात 52% लोकसंख्या दक्षिण आशियाई आहे, यात मोठ्या प्रमाणावर पंजाबी शीख लोकांचा सर्वाधिक समावेश आहे.
भारतावरील हस्तक्षेपाचे आरोप आणि वाढता तणाव
सर्वेक्षण अहवालात दिलेलल्या माहितीनुसार, भारत हा कॅनडाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय, हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येच्या भारतावरील आरोपाने भारत आणि कॅनडामधील संबंध अधिक तणावग्रस्त झाले आहेत.
मात्र या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की, बहुतेक कॅनडियन नागरिक खलिस्तानी हालचालींना विरोध करतात आणि सरकारने याविषयी कठोर पावले उचलावीत अशी त्यांची इच्छा आहे. तसेच, काही शीख नागरिक या आंदोलनामुळे अनावश्यक चौकशीला सामोरे जात आहेत. भारत आणि कॅनडामधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे