डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने वाढली कॅनडाची चिंता; टॉम होमनला दिली 'ही' खास जबाबदारी
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला असून सर्वांचे लक्ष आता त्यांच्या कार्यकाळ कसा असेल? याशिवाय ते कोणते निर्णय गेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्थलांतर धोरणावर भर देत अमेरिकेच्या सीमेच्या संरक्षणासाठी एक कठोर पाउल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी ‘इमिग्रेशन कस्टम्स अँड एनफोर्समेंट’ (ICE) चे माजी संचालक टॉम होमन यांना आपल्या आगामी प्रशासनात सीमा सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
टॉम होमन कोण आहेत?
टॉम होमन हे अमेरिकन इमिग्रेशन आणि कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) चे माजी कार्यकारी संचालक आहेत. 2017 मध्ये, ट्रम्प यांच्या अध्यक्षतेच्या दुसऱ्याच आठवड्यात, होमन यांना ICE चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने त्यांना कायमचे संचालक म्हणून पुढे नेमण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यावेळी सिनेटने त्यांच्या नामांकनावर कोणतीही कारवाई केली नाही.
होमन यांचे नाव विशेषतः “शून्य सहिष्णुता” धोरणाशी जोडले गेले आहे, ज्याअंतर्गत अमेरिकेत अनधिकृतरीत्या प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना कडक शिक्षा दिल्या जात होत्या. या धोरणामुळे अनेक स्थलांतरित कुटुंबांतील मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करण्यात आले होते, ज्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वाद उद्भवले. हे धोरण 2017 मध्ये सुरू झाले आणि 2018 मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला, मात्र देशांतर्गत विरोधामुळे हे धोरण नंतर मागे घेतले गेले.
कॅनडा हाय अलर्टवर का आहे?
ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेतील स्थलांतर धोरण कठोर करण्याचे वचन दिले होते. विशेषतः बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध मोठी कारवाई करून त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे अमेरिकेतून स्थलांतरितांना कॅनडाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे कॅनडाचे अधिकारी हाय अलर्टवर आहेत.
कॅनडामध्ये स्थलांतरांची संख्या वाढू शकते
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या कॅनडात वाढू शकते. यामुळे आम्ही सीमेवर अधिक सतर्क आहोत.” असे स्पष्ट करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या धोरणांमुळे कॅनडा-अमेरिका सीमेवरील स्थिती अधिक संवेदनशील होण्याची शक्यता असून कॅनडाने स्थलांतराबाबत विशेष पाऊले उचलण्याची तयारी केली आहे.
बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार करत कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. दरम्यान कमला हॅरिस यांच्या समर्थकापैकी एका व्यक्तीने जो बायडेन यांना इस्ताफा देऊन कमला हॅरिस यांना अध्यक्षपद सोपवण्याची मागणी केली आहे.