फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राधक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताने विजय झाला. त्यांच्या विजयानंतर इतर देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांच्या विजयानंतर त्यांचा कार्यकाळ कसा असेल यावर देखील आपली मते मांडली. दरम्यान ट्रम्प यांच्या विजयानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रथमच आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांच्या विजयामुळे जगभरात अनेक देश चिंतेत असले तरी भारताला मात्र विशेष चिंता वाटत नाही.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी भारताच्या पंतप्रधानांचे संबंध चांगले
एस. जयशंकर यांनी म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. यामुळे भारताला या संबंधामध्ये प्रगती साधण्यास मदत होते. मुंबई मध्ये आदित्य बिर्ला समहू शिष्यवृत्ती कार्यक्रमात जयशंकर यांनी ट्रम्प यांच्याविषयी आपले मत मांडले. जयशंकर म्हणाले की, ट्रम्प यांच्या विजयानंतर ट्रम्प यांनी प्रथम मोदींशी संपर्क साधला. मोदींनी पूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. या वैयक्तिक संबंधांमुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत होण्यास मदत मिळाली आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख वाढली
परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख कायम केली आहे. देशात होत असलेले विकास प्रकल्प, नवीन विमानतळ, मेट्रो, महामार्ग आणि रेल्वे सुविधांचा उल्लेख त्यांनी कौतुकाने केला. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढत अशल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारच्या विविध धोरणांमुळे व्यवसाय करण्यास सोपे होत असून जागतिक बाजारपेठेत भारताची स्थिती बळकट होत चालली असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, डिजिटलीकरणामुळे जागतिक व्यापारात बदल होत असल्याने भारताने बदलांसाठी तयार राहिले पाहिजे, असेही जयशंकर म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील त्यांचा अनुभव सकारात्मक राहिल्याचे त्यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांचे मोदींशी चांगले संबंध असल्यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी सुधारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ट्रम्प यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले असून, दोन्ही देशांच्या सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
ट्रम्पचा ॲरिझोनामध्ये विजय- सातही स्विंग राज्ये केली काबीज
ट्रम्प यांना या निवडणुकीत 312 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. हा आकडा ट्रम्प यांना 2016 च्या निवडणुकीत मिळालेल्या 304 मतांच्या आकड्यापेक्षा अधिक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिपब्लिकन पक्षाने यावेळी मिशिगन, जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन, आणि ऍरिझोनासह स्विंग राज्यांवर नियंत्रण मिळवत, नेवाडा आणि नॉर्थ कॅरोलिनासारखी महत्त्वाची राज्येही जिंकली आहेत.