
नेपाळमध्ये जलप्रलय ! हजारो लोक गेले वाहून; महापुरामुळे जनजीवन ठप्प
काठमांडू : तिबेट सीमेजवळील नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी हानी झाली. या महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि विविध प्रकल्पस्थळे वाहून गेल्याचे वृत्त असून, सुमारे १००० जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या आकडेवारीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या जलप्रलयात १३३ भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
स्थानिक वेळेनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. भोटेकोशी नदीचा उगम तिबेटच्या भागात होत असल्याने तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले. नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, तोपर्यंत अनेक गावे पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यात वाहून गेली. अद्याप १०० हुन अधिक मृतदेह हाती लागले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
– राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : १०७० (टोल-फ्री क्रमांक)
– नियंत्रण कक्ष +९१-९३२१५८७१४३
– अधिकृत ई-मेल : controlroom@ma-harashtra.gov.in
भारताकडून 10 टन मदत सामग्री
नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्याशी संवाद साधला आणि पुरात प्राण गमावलेल्यांप्रति शोक व्यक्त केला. दरम्यान, भारताने शेजारधर्म पाळत नेपाळला १० टन मदत सामग्री पाठवली. यासह औषधांचा साठाही पाठवला आहे.
बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा
नेपाळमधील गंडक नदीच्या ऊपरी जलग्रहण क्षेत्रात आलेल्या पुरामुळे बिहारमध्येही पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. गंडक नदीच्या प्रवाहात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता असून, नदीत सुमारे तीन मीटरपर्यंत उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन बिहार प्रशासनाने नदीकाठच्या ६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.