India China to resume Kailash Mansarovar Yatra direct flights in 2025
नवी दिल्ली: भारत-चीन संबंध आता सकारात्मकतेच्या दिशेने वळत आहेत. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांनी आणखी एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. भारत आणि चीनने 2020 पासून थांबवलेल्या मानसरोवर यात्रेचा पुन्हा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही देशांत थेट विमानसेवाही पूर्ववत होणार आहे. हा निर्णय भारताच्या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. विक्रम मिस्री यांनी बिजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती.
वांग यी यांच्याशी भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून परराष्ट्र मंत्रालयाने या मानसरोवर यात्रेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि पद्धतींची चर्चा संबंधित यंत्रणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, भारत-चीन तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची लवकरच बैठक होणार असून सीमा ओलांडून जाणाऱ्या नद्यांच्या संदर्भातील जलविद्युत आकडेवारीची देवाणघेवाण आणि इतर सहकार्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे सुरु होणार
तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय, माध्यमे आणि विचारमंथन गटांद्वारे भारत-चीन लोकांमधील संपर्क वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “कार्यशील दळवळणासाठी आधुनिक यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. हळूहळू या संवादांना पुन्हा सुरू करून प्राधान्याच्या क्षेत्रांवर चर्चा करण्याचे ठरले. याशिवाय आर्थिक आणि व्यापार क्षेत्रातील विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करून दीर्घकालीन धोरणात्मक पारदर्शकता आणि स्थिरता वाढवण्यावर भर देण्यात आला.”
विक्रम मिस्रींचा दोन दिवसीय चीन दौरा
सध्या भारताचे परराष्ट्र सिचव विक्रम मिस्री हे परराष्ट्र सचिव-उपमंत्री यंत्रणेच्या बैठकीसाठी दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर आहेत. या यंत्रणेच्या पुर्नस्थापनेचा उद्देश भारत-चीन संबंधांच्या पुढील टप्प्यांवर चर्चा करणे आहे. यात राजकीय, आर्थिक आणि लोकांमधील संवाद यांचा समावेश आहे.
भारत-चीन संबंध सामान्य होण्यासाठी सीमेवरील शांतता आवश्यक असल्याचे भारताने नेहमीच म्हटले आहे. डेमचोक आणि डेपसांग या भागांतील सैन्य माघारीच्या प्रक्रियेच्या पूर्णतेनंतर चार-साडेचार वर्षांनंतर भारतीय आणि चीनी सैन्यांनी पुन्हा गस्त घालणे सुरू केले आहे. यामुळे भारत आणि चीन मधील हा निर्णय विश्वास आणि सहकार्य वाढवण्याच्या दिशेन महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी, भारत आणि चीनमधील संबंधांचे सुधार व विकास हे दोन्ही देशांच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर देशांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात याचा हातभार लागेल असेही ते म्हणाले.