India send consignments of humanitarian aid to Iraq know the details
नवी दिल्ली: भारताने नेहमीच जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या देशाने नेहमीच संकटाच्या काळी इतर देशांना मदत केली असून पुन्हा एकदा भारताने ‘विश्वबंधु’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. भारताने इराकला मानवतावादी मदत पुरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी (27 जानेवारी) जाहीर केले की, भारताने इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात औषधांची एक मोठी शिपमेंट पाठविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शिपमेंमध्ये ब्रोन्कोडायलेटर्स, इनहेलर्स आणि व्हेंटिलेटर्स यांचा समावेश आहे, यामुळे गरजू लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यात मदत होणार आहे. MEA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत यासंबंधित माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये, “विश्वबंधु भारत: भारताने इराकला मानवीय मदत पाठवली आहे. इराकच्या कुर्दिस्तान भागातील लोकांसाठी मदत म्हणून ब्रोन्कोडायलेटर्स, इनहेलर्स आणि व्हेंटिलेटर्स युक्त शिपमेंट नवी दिल्लीहून रवाना झाली आहे.” असे म्हटले आहे.
Vishwabandhu Bharat: 🇮🇳 sends Humanitarian Assistance to Iraq.
A consignment consisting of bronchodilators, inhalers and ventilators has departed from New Delhi to assist the people in the Kurdistan region of Iraq. pic.twitter.com/YobqvQjWWi
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 27, 2025
भारत-इराक संबंध
भारत आणि इराक यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते संबंध आहेत. भारताने इराकच्या पुनर्निर्माण आणि विकासामध्ये नेहमीच सहाय्य केले आहे. 2003 सालापासून भारताने एक स्वतंत्र, लोकशाहीवादी, बहुविध आणि संघराज्यात्मक इराकला पाठिंबा दिला आहे. 2003 मध्ये इराकमधील युद्धाच्या वेळी भारताने 20 मिलियन अमेरिकी डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली होती. याशिवाय, जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत (WFP) दूध पावडर पुरवली. तसेच इराकी अधिकाऱ्यांना कूटनीती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण दिले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि निर्वासितांसाठी मदत
भारताने इराकच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच सीरियामधील इराकी निर्वासितांसाठी देखील मदत पाठवली होती. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण निधी सुविधेसाठी (IRFFI) भारताने 10 मिलियन अमेरिकी डॉलरचे योगदान दिले होते. 2018 मध्ये कुवैत परिषदेत भारताच्या प्रतिनिधी एम.जे. अकबर यांनी इराकच्या पुनर्निर्माणात भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
आर्थिक व तांत्रिक सहकार्य
भारताने इराकला आर्थिक मदतीबरोबरच तांत्रिक मदतही पुरवली आहे. एप्रिल 2022 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांच्या तपास पथकाला (UNITAD) 200,000 अमेरिकी डॉलरचे योगदान दिले होते. या निधीचा उपयोग ISIS ने केलेल्या रासायनिक व जैविक शस्त्रांच्या विकासाच्या चौकशीसाठी, तसेच सांस्कृतिक व धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांबाबत जबाबदारांना शिक्षा देण्यासाठी करण्यात आला. भारताच्या या मानवीय व आर्थिक योगदानामुळे जागतिक स्तरावर त्याचे कौतुक होत आहे, आणि इराकच्या गरजू लोकांना दिलासा मिळाला आहे.