'आधी माफी मागा, मगच...', पाकिस्तान सरकार एलॉन मस्कवर का संतापले? काय आहे नेमकं प्रकरण?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: अलीकडे टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क चर्चेचा विषय बनत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीनंतर ते अनेक वेळा चर्चेत आले आहेत. दरम्यान एलॉन मस्क आणि पाकिस्तान सरकारमध्ये एक नवा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तान सरकारने एलॉन मस्कवर पाकिस्तानविरोधी वक्तव्ये केल्याचा आरोप केला असून त्यांनी पाकिस्तानविरोधी प्रचार केला असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने एलॉन मस्क यांच्या माफीची मागणी केली आहे.
मस्क यांना पाकिस्तान मध्ये इंटरनेटसेवा सुरु करण्याची परवानगी मिळणार?
या सर्व गोष्टी अशा वेळी घडत आहे जेव्हा मस्क यांच्या सॅटेलाइट कंपनी स्टारलिंकने पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी नियामक परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पाकिस्तान सरकारने अद्याप या अर्जाला मंजुरी दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने एलॉन मस्क यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानमधील माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार समितीने स्टारलिंकसाठी मस्कच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.
पाकिस्तान अधिक संतापला
या समितीचे अध्यक्ष पलवाशा मोहम्मद जई खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अनेक संसद सदस्य मस्कच्या सोशल मीडिया पोस्टवर नाराज आहेत, यामध्ये मस्क यांनी पाकिस्तानविरोधी विधान केले हेते. एलॉन मस्कवर पाकिस्तानचे संसद सदस्य संताप वाढत चालला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, मस्क यांच्या पोस्टचा मुद्दा ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाच्या लोकांविरुद्ध झालेल्या बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणाशी संबंधित आहे. 1997 ते 2013 दरम्यान ब्रिटनमधील रॉदरहॅममध्ये 1400 पेक्षा जास्त बालकांचे शोषण करण्यात आले होते. या प्रकरणात पाकिस्तानी वंशाच्या लोकांचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.
यावर, एलॉन मस्क यांनी ब्रिटन सरकारवर टीका केली होती. एलॉन मस्क यांच्या या विधानावर पाकिस्तानच्या काही नेत्यांनी संताप व्यक्त केला असून त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. विशेषत: मस्क यांनी ‘आशियाई गँग’ असा उल्लेख केल्याने पाकिस्तानच्या संसद सदस्यांचा संताप तीव्र झाल आहे.
भारताचाही समावेश?
या प्रकणावर भारतच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आशियाई टोळी नाही पाकिस्तानी टोळी असे म्हटले होते तर, एलॉन मस्क यांनी याचे समर्थन करत ‘सच’ असे म्हटले होते. या कारणाने पाकिस्तान सरकार संतापलेले असून मस्क यांच्याकडून माफीची मागणी केली आहे आणि त्यानंतरच स्टारलिंकच्या इंटरनेट सेवा पुरवठ्यासाठी नियामक मंजुरी विचारण्याचे सांगितले आहे. या वादामुळे भविष्यातील व्यवसायिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे.