Indian-origin Anita Anand drops out of Canada's PM race
ओटावा: कॅनडामधील भारतीय वंशाची मंत्री अनिता आनंद यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आनंद पुन्हा संसदीय निवडणुकही लढवणार नसल्याचे जाहीरे केले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनिता आनंद यांनी देखील राजकारणातून माघार घेऊन अकादमिक क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिता आनंद यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की, “पंतप्रधानांनी त्यांचा पुढील अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, मी देखील माझ्या व्यावसायिक जीवनाच्या पुढील टप्प्यावर परतण्याचा निर्णय घेत आहे. मला माझ्या शिक्षण, संशोधन आणि सार्वजनिक धोरण विश्लेषणाच्या आधीच्या क्षेत्रात परतायचे आहे.” यामुळे मी कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Please see my statement. pic.twitter.com/UePgtYFUHJ
— Anita Anand (@AnitaAnandMP) January 11, 2025
काय म्हणाल्या अनिता आनंद?
व्यवसाय आणि वित्तीय कायद्याच्या तज्ज्ञ असलेल्या आनंद यांचा पूर्वी टोरांटो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यकाळ होता. त्यांनी येल विद्यापीठातही व्याख्यान दिले होते. 2019 साली ओंटारिओच्या ओकविले मतदारसंघातून संसदेत निवडून आल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या भारतीय वंशाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “2019 साली माझ्या पहिल्या प्रचारादरम्यान, अनेकांनी सांगितले की भारतीय वंशाची महिला ओकविलमध्ये निवडून येऊ शकत नाही.
मात्र, ओकविलच्या लोकांनी मला सलग दोन वेळा पाठिंबा दिला, ही माझ्यासाठी कायमचा अभिमानाचा भाग राहील.”2019 साली ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात सामील होताना अनिता आनंद यांनी सार्वजनिक सेवा आणि पुरवठा मंत्री म्हणून कोविड-19 च्या काळात वैद्यकीय साधनसामुग्री व लसींचा पुरवठा सुनिश्चित केला. 2021 साली संरक्षण मंत्रीपद सांभाळताना त्यांनी कॅनेडियन सशस्त्र दलातील लैंगिक अत्याचारांच्या मुद्द्यांवर ठोस पावले उचलली आहेत. तसेच त्यांनी परिवहन मंत्री आणि अंतर्गत व्यापार पोर्टफोलिओ देखील संभाळले आहे.
इतर अनेक नेत्यांची शर्यतीततून माघार
आपल्या वेगवान कारकीर्दीचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, “2019 साली माझ्या कामाचा असा व्यापक परिणाम होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.” ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षाने 9 मार्चपर्यंत नवीन नेत्याची निवड करायची आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या प्रचंड आघाडीमुळे लिबरल पक्षाच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी शर्यतीतून माघार घेतली आहे.