बांगलादेशची कबुली! हिंदूंसह अल्पसंख्याकांवर हल्ल्यांमागे राजकीय स्वरुप; 'इतकी' प्रकरणे आली नोंंदवण्यात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार अशा अनेक घटना घडल्या. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशने हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांची बाब आता जगजाहीर केली आहे.
हिंदूंवरील हल्ल्यांमागे राजकीय स्वरुप
केवळ हिंदूच नव्हे तर इतर अल्पसंख्यांक समुदायही बांगलादेशात सुरक्षित नाहीत. हिंदूंवर हल्ले, मंदिरांची तोडफोड आणि इतर प्रकारच्या हिंसेबाबत बांगलादेश सरकारने प्रथमच खुलासा केला आहे. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने या घटनांमागील कारणे उघड केली आहेत. बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 4 ऑगस्टपासून अल्पसंख्याक समुदायांवर वारंवार हल्ले झाले आहेत. बहुतेक घटनांमध्ये या हल्ल्यांना राजकीय स्वरूप असल्याचे सरकारने मान्य केले आहे. तसेच, काही घटनांना साम्प्रदायिक प्रेरणा असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.
राजकीय प्रेरणा आणि साम्प्रदायिक हिंसा
पोलिसांनी अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्याक समुदायांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये राजकीय कारणांचा मोठा वाटा आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदने दावा केला होता की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्टला देश सोडल्यानंतर, 2010 साम्प्रदायिक हिंसेच्या घटना घडल्या. यातील 1769 घटना हल्ले आणि तोडफोडीच्या स्वरूपाच्या होत्या. या प्रकरणांवर कारवाई करत पोलिसांनी 62 प्रकरणे नोंदवली असून 35 दोषींना अटक केली आहे.
तसेच, या हिंसाचाराबाबत पोलिसांनी अल्पसंख्याक समुदायाशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, 5 ऑगस्ट 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान साम्प्रगायिक हिंसेच्या 134 घटना नोंदल्या गेल्या आणि पोलिसांनी यातील 53 प्रकरणे नोंदवली असून 65 आरोपींना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.परिषदेने केलेल्या दाव्यानुसार, साम्प्रदायिक हिंसेच्या घटनांत वाढ झाली असून अल्पसंख्याकांच्या मालमत्तेचे नुकसान, मंदिरांवर हल्ले आणि धार्मिक असहिष्णुतेच्या घटना वाढत्या प्रमाणात घडत आहेत.
सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
बांगलादेश सरकारने या प्रकरणांची दखल घेतली असली तरी साम्प्रदायिक हिंसेच्या घटना थांबवण्यात अद्याप यश आलेले नाही. हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय कारणांनी प्रेरित असलेल्या या हिंसेमुळे सामाजिक तणाव वाढत असल्याचे दिसून येते. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले अधिक चिघळण्याची शक्यता आहे.