इंडोनेशिया बनला BRICS चा सदस्य; वर्षभरानंतरही सौदी अरेबियाचा समावेश नाही
जकार्ता: जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया BRICS गटाचा स्थायी सदस्य बनला आहे. या BRICS गटामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साउथ आफ्रिका या देशांचा समावेश असून आता इंडोनेशिया देखील याचा भाग असणार आहे. 2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद ब्राझीलकडे असणार असून ब्राझीलने याची औपचारिक घोषणा केली. इंडोनेशियाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच सौदी अरेबिया मात्र, BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय अजूनही स्थगित ठेवला आहे.
2023 मध्येच मिळाली होती संमती
इंडोनेशियाला 2023 मध्ये जोहान्सबर्ग समिटमध्येच BRICS मध्ये सामील होण्यासाठी संमती मिळाली होती. मात्र, त्या वेळीचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी निवडणुका होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची विनंती केली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रोबोवे सुबियांतो राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर हा निर्णय पुढे नेण्यात आला.
हे देश अजूनही BRICS मध्ये नाहीत
याशिवाय, साउथ आफ्रिकेने 2023 मध्ये इराण, UAE, इजिप्त, इथिओपिया आणि सौदी अरेबियाला देखील BRICS मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, सौदी अरेबियाने 2024 मध्ये गटात सामील होण्याची प्रक्रिया स्थगित केली असून त्यांच्या निर्णय अद्याप स्पष्ट नाही. सौदी अरेबियाच्या निर्णयामागे अमेरिकेचा दबाव असल्याचे म्हटले जाते. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि तुर्कीने या गटामध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला होता.
चीन आणि रशियाचा पाकिस्तानला पाठिंबा असूनही भारताच्या विरोधामुळे तो BRICS चा सदस्य होऊ शकला नाही. BRICS मध्ये कोणत्याही नव्या देशाच्या प्रवेशासाठी सर्व सदस्यांची संमती आवश्यक असते. तुर्कीने देखील 2024 मध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केला होता, परंतु त्यालाही यश मिळाले नाही. BRICS च्या 2024 च्या समिटमध्ये 13 देशांना पार्टनर देश म्हणून स्थान देण्यात आले, पण पाकिस्तानला त्यामध्येही स्थान मिळाले नाही.
2025 चे BRICS चे ब्राझीलकडे नेतृत्व
जुलै 2025 मध्ये BRICS चा वार्षिक समिट ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली रिओ डी जानेरियो येथे होईल. यंदाची थीम “ग्लोबल साउथ” आहे, यामध्ये सदस्य देशांमधील व्यापार सोयीसाठी पेमेंट गेटवे विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.2006 मध्ये स्थापन झालेल्या BRICS ने जगातील तिसऱ्या सर्वात ताकदवान आर्थिक संघटनेचा दर्जा मिळवला आहे. ग्लोबल GDP मध्ये BRICS चा वाटा 27% पेक्षा अधिक आहे, जो युरोपियन युनियनच्या 14% च्या तुलनेत दुप्पट आहे. BRICS च्या विस्तारामुळे या संघटनेचे महत्व अधिक वाढले आहे, ज्यामुळे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत नवी समीकरणे तयार होत आहेत.