फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वाकारण्याआधी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांच्या अजेंड्यात एक महत्त्वाची बाब म्हणजे कॅनडाला अमेरिकाचा 51वा राज्य बनवण्याचा प्रस्ताव. या विषयावर त्यांनी अनेक वेळा वक्तव्ये केली आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा राजीनामा देताच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला अमेरिकेचा भाग बनण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता त्यांनी यासंबंधित आणखी एक वादग्रस्त पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जस्टिन ट्रुडोंनी प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता
आता त्यांनी सोशल मीडियावर दोन नकाशे शेअर केले आहेत, यात त्यांनी कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवले आहे. त्यांच्या या कृतीमुळे कॅनडाच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्रम्प यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की कॅनडा हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे आणि तो कधीही अमेरिकेचा भाग होणार नाही. ट्रुडो यांनी ट्रम्प यांच्या विधानावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.
BREAKING: Trump shares another map with Canada as part of the United States pic.twitter.com/C4GP7OOjmj
— The Spectator Index (@spectatorindex) January 8, 2025
कॅनडाच्या राजकीय नेत्यांचा तीव्र निषेध
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी देखील ट्रम्प यांच्या विधानावर संताप व्यक्त करत ट्विट केले की, ट्रम्प यांना कॅनडाच्या स्वातंत्र्य आणि सामर्थ्याची पुरेशी जाणीव नाही. जोली यांनी असेही नमूद केले आहे की, कॅनडा कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना भीक घालणार नाही. याशिवाय, कॅनडातील विरोधी पक्षनेते पियर पॉलिवेयर यांनीही ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की कॅनडा हा स्वतंत्र आणि महान देश आहे. अमेरिका हा कॅनडाचा उत्तम मित्र आहे, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की कॅनडा आपली सार्वभौमता गमावेल. ट्रम्प यांच्या विधानामुळे कॅनडा-अमेरिका संबंध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिकेच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.
कोणताही कर आकारण्यात येणार नाही आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षाही मिळेल
ट्रम्प यांनी कॅनडाला इशारा देत सांगितले की, कॅनडा जर अमेरिका बनले तर त्यांच्यावर कोणताही कर लावला जाणार नाही आणि रशिया व चीनच्या धमक्यांपासून कॅनडा सुरक्षित राहील. तसेच, दक्षिण सीमेमार्फत होणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखले नाही तर कॅनडियन आयातीवर 25 टक्के कर लावला जाईल. या विधानांमुळे कॅनडामधील नेत्यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की कॅनडा आपली स्वतंत्रता आणि सार्वभौमता जपण्यासाठी सदैव तयार आहे.