Iranian government jails 21 thousand people on espionage charges
Iran News in Marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमधील युद्ध संपूण आज २ महिने पूर्ण झाली आहेत. परंतु इराणच्या इस्रायलविरोधी कारवाया सुरुच आहेत. गेल्या २ महिन्यात इराणने २१ हजार लोकांना तुरुंगात टाकले आहे. या लोकांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. १२ दिवसांच्या युद्धबंदीनंतर इराणने देशात हेरगिरीविरोध तीव्र मोहिम सुरु केली होती, जी आजही सुरु आहे.
इराणी पोलिसांनी देशभरात छापे टाकून २१ हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. तसेच सामान्यांपासून ते सरकारी वकिलांना अटक करण्यात आली आहे. संशयाच्या आधाराखाली या लोकांना अटक केली जात आहे.
इराणने आतापर्यंत ७ जणांना इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसाद साठी हेरगिरी केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा दिली आहे. यामध्ये इराणच्या अणुशास्त्रज्ञ रुझबेह वादी यांनाही फाशी देण्यात आली आहे. त्यांनी मोसादला इराणच्या अणु प्रकल्पांविषयी गुप्त माहिती लोकांना पुरवल्याचा आरोप आहे. तसेच ३ कुर्दिश लोकांनाही फाशी सुनावण्यात आली आहे.
इस्रायलने इराणविरोधी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरु केले होते. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. यामध्ये इस्रायलने इराणच्या १४ अणु शास्त्रज्ञांना तसेच २० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. तसेच यामध्ये इराणचे ९७४ नागरिकही मृत्यूमुखी पडले होते आणि १४८४ लोक जखमी झाले होते. शिवाय अमेरिकेने या युद्धात हस्तक्षेप करत इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर हल्ला केला होता. यामध्ये इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहन या अणु तळांचे प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावरण होते.
याशिवाय इराणने इस्रायलच्या हल्ल्यानंतर अनेक अफगाण नागरिकांना देखील देशातून हद्दपार केले आहे. यामुळे अफगाणिस्तानात मानतावादी संकट उभे राहिले आहे. संयुक्त राष्ट्राने इराणच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. आतापर्यंत १.३ दशलक्षाहून अधिक अफगाण लोक परतले आहे. ही संख्या ३ दशलक्षापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.