'आम्हीच हमास प्रमुख इस्माईल हनीहलला मारले'; हत्येच्या पाच महिन्यानंतर दिली इस्त्रायलने कबुली
जेरुसेलम: एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने हमासचे माजी प्रमुख इस्माइल हानियेह यांची हत्या केली असल्याचे कबुल केले आहे. पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची जबाबदारी इस्त्रायलने प्रथमच स्वीकारली आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी घोषित केले की आहे की, जो कोणी इस्त्रायल विरोधात कट उचलेल, त्याला संपवण्यात येईल. त्यांनी येमेनमधील हौथी बंडखोरांच्या नेतृत्वाला नष्ट करण्याचीही धमकी दिली आहे.
कशी झाली इस्माईलची हत्या
इस्माइल हानियेह यांचा मृत्यू 31 जुलै रोजी इराणच्या राजधानी तेहरानमधील एका गेस्टहाउसच्या स्फोटात झाला होता. हा स्फोट इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी आयोजित केल्याचे म्हटले जात आहे. हानियेह तेहरानमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेज़ेशकियान यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या आगमनाच्या काही आठवड्यांपूर्वीच गेस्टहाउसवर स्फोटके ठेवण्यात आली. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने असा दावा केला होता की, हानियेह यांना त्यांच्या निवासस्थानाबाहेरून प्रक्षेपित केलेल्या छोट्या अंतराच्या प्रोजेक्टाइलने मारले गेले. इराणने यासाठी अमेरिकेवर इस्त्रायलला पाठिंबा दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
In the first public admission to eliminating Hamas leader Ismail Haniyeh, Israeli Defense Minister Israel Katz says: “We will severely cripple the Houthis, damage their strategic infrastructure and decapitate their leaders – just as we did to Haniyeh, Sinwar and Nasrallah in… pic.twitter.com/VVEh0Rqx86
— Ariel Oseran (@ariel_oseran) December 23, 2024
इस्त्रायलविरोधात हमास आणि हिजबुल्लाह यांच्यात तीव्र आक्रोश
हानियेह यांची हत्या झाल्यानंतर मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव अधिक तीव्र झाला आहे. या घटनेनंतर हमास आणि हिजबुल्लाहने इस्त्रायला प्रतिशोध घेण्याची धमकी दिली. परिणामी, अमेरिकेने या भागात अधिक लढाऊ विमाने आणि नौदल युद्धनौका तैनात केल्या आहेत. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी केवळ हानियेहच नव्हे तर गाझा आणि लेबनॉनमध्ये याह्या सिनवार आणि हसन नसरल्लाह यांच्यावरही कठोर कारवाई केली आहे. त्यांनी येमेनमधील होदेदा आणि सना येथेही अशाच प्रकारची कारवाई करण्याची तयारी इस्त्रायल करत असल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायलच्या धोरणावर जगभरातून टीका
हानियेह यांची हत्या जाहीरपणे स्वीकारल्यामुळे इस्त्रायलच्या धोरणावर जगभरातून टीका केली जात आहे. त्याचबरोबर या घटनेने इस्त्रायल आणि इराणमधील तणाव आणखी वाढवला आहे. हानियेह यांच्या मृत्यूनंतर हमास आणि इराणने इस्त्रायलविरोधातील आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. इस्त्रायलच्या या हालचालींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ही घटना केवळ इस्त्रायल-इराण संघर्षापुरती मर्यादित नसून संपूर्ण क्षेत्रासाठी धोका बनू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. इस्त्रायलने घेतलेली जबाबदारी आणि त्याची संभाव्य परिणामकारकता याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.