Nepal Flood: त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची सुटका, पहा व्हिडिओ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
नेपाळमध्ये (Nepal Flood) भोटेकोशी नदीला आलेल्या महापुराने आणि भूस्खलनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या भीषण आपत्तीत सर्व काही उद्ध्वस्त झाले असतानाच, शुक्रवारी एका अत्यंत थक्क करणाऱ्या आणि आशेचा किरण दाखवणाऱ्या घटनेची नोंद झाली. भीषण पुराच्या तब्बल ९ दिवसांनंतर त्रिशुली-३ए (Trishuli-3A) जलविद्युत प्रकल्पाच्या चिखल आणि ढिगाऱ्यांनी बंद झालेल्या बोगद्यातून दोन कामगारांना सुखरूप आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसून या सुटकेमुळे अद्याप बोगद्यात अडकलेल्या शेकडो कामगारांच्या नातेवाइकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने त्रिशुली-३ए प्रकल्पाच्या ढिगाऱ्यांनी वेढलेल्या मुख्य बोगद्यातून सर्वात आधी संजय शाह (Sanjay Shah) यांना बाहेर काढले. संजय हे या प्रकल्पात मेकॅनिकल फोरमन (Mechanical Foreman) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सुटकेनंतर अवघ्या काही वेळातच त्याच बोगद्यातून कबीर महर्जन (Kabir Maharjan) यांनाही बाहेर आणण्यात आले, जे मेकॅनिकल सुपरवायझर (Mechanical Supervisor) म्हणून काम पाहत होते. ९ दिवस अन्न आणि पाण्याविना अंधाऱ्या बोगद्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दोन्ही कामगारांना तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या थरारक बचावकार्याची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. गेल्या ९ दिवसांपासून नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस दल आणि तज्ज्ञांचे पथक चिखल व प्रचंड दगड बाजूला सारून बोगद्याचा रस्ता शोधत होते. शुक्रवारी सकाळी बचाव पथक बोगद्याच्या खोल भागात पोहोचले असता, त्यांना आतून अतिशय क्षीण मानवी आवाज ऐकू आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बचाव पथकातील एका जवानाने मोठ्या आवाजात घोषणा केली, “घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आहोत!”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indus Waters Treaty: ‘आम्ही चिनाब धरण मिसाइलने उडवून देऊ’; सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानी पत्रकाराची भारताला अणूधमकी
त्यावर बोगद्याच्या आतून “होय, आम्ही आत आहोत” असा प्रतिसाद आला. आत श्वास चालू असल्याचे स्पष्ट होताच बचाव पथकाने अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आणि अवघ्या काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बोगद्याचा मार्ग मोकळा करून दोघांना सुरक्षित बाहेर काढले. ज्या वेळी संजय शाह आणि कबीर महर्जन यांना चिखलाने माखलेल्या अवस्थेत सैनिकांच्या खांद्यावर बाहेर आणण्यात आले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
VIDEO | Nepal: A person identified as Sanjay Shah rescued alive today from the tunnel of Trishuli–3 ‘A’ Hydropower Project. Visuals of the rescued person. (Source: Third Party) (Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/kM7nRYZN9p — Press Trust of India (@PTI_News) September 4, 2026
credit – social media and Twitter
एकीकडे दोन कामगारांची झालेली सुटका आशेचा किरण ठरत असली, तरी नेपाळमधील पुराचे एकूण चित्र अत्यंत भयावह आहे. नेपाळ पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, भोटेकोशी नदीतील महापुरामुळे आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १,२८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्दैवाने ५,०८३ हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये सुमारे ५०० हून अधिक कामगार अजूनही अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्रिशुली-३ए बोगद्यात आणखी काही लोक जिवंत असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बचावकार्य अधिक वेगाने सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China : ड्रॅगनने दडवले तिबेटच्या शोकांतिकेचे सत्य; सेन्सॉरशिप ठरली आपत्ती, ‘RSF’ कडून चिनी डिजिटल नाकेबंदीचा पर्दाफाश
भोटेकोशी पुरामुळे झालेल्या या अकल्पनीय विनाशाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. या आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि उद्योगांसाठी ‘सर्वसमावेशक व्यवसाय पुनरुद्धार पॅकेज’ जाहीर करण्यात आले आहे.
नेपाळच्या अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, नेपाळ-चीन सीमावर्ती भागातील विस्कळीत झालेले आर्थिक चक्र पूर्ववत करण्यासाठी सीमा शुल्क (Custom Duty) माफी, कर सवलती, बँक कर्जाचे पुनर्गठन आणि विमा दाव्यांचे जलद हस्तांतरण यांसारख्या मोठ्या सवलती दिल्या जाणार आहेत. पुराच्या सावटातून देशाला आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा उभे करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.






