DNA, पासपोर्ट अन् पोस्टमार्टम... नेपाळच्या पुरातील मृतांची ओळख कशी पटणार? कशी असते संपूर्ण प्रक्रिया?
नेपाळ सरकारने विदेशी नागरिकांच्या पार्थिवाची ओळख पटवून ते संबंधित देशाच्या ताब्यात देण्यासाठी नऊ टप्प्यांची प्रक्रिया निश्चित केली आहे. यामध्ये मृतदेहाचे दस्तऐवजीकरण, छायाचित्रे व इतर तपशील नोंदवणे, शवविच्छेदन, मृत्यूच्या कारणाची खातरजमा, औपचारिक ओळख, फिंगरप्रिंट/DNA/फॉरेन्सिक नमुने, पासपोर्ट किंवा ओळखपत्र पडताळणी, संबंधित दूतावासाशी समन्वय आणि अखेरीस हँडओव्हर/रिलीज मेमो व पावतीची प्रक्रिया पूर्ण करणे यांचा समावेश आहे. यातील पहिले चार टप्पे नेपाळी अधिकारी पूर्ण करणार आहेत.
Russia-Ukraine War : कीव्हवरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू; रशिया-युक्रेन युद्धाची भारताला पुन्हा झळ
नेपाळ पोलिसांनी मृतांच्या ओळखीसाठी उपलब्ध छायाचित्रे आणि तपशील ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. एखाद्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांनी या माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवल्यास काठमांडूतील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी आणि भारतात आणण्यासाठी मदत करेल.
आपत्तीची व्याप्ती मोठी असल्याने शवागारांवर प्रचंड ताण आला आहे. अनेक मृतदेहांची स्थिती अशी आहे की केवळ पाहून त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी नेपाळ सरकारने अनेक अज्ञात मृतदेह DNA आणि इतर फॉरेन्सिक नोंदी सुरक्षित केल्यानंतर तात्पुरते दफन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ज्या मृतदेहांची छायाचित्रे, कपडे किंवा कागदपत्रांवरून ओळख पटू शकत नाही किंवा ज्यांचे पार्थिव तात्पुरते दफन करण्यात आले आहे, अशा प्रकरणांत DNA matching महत्त्वाचे ठरणार आहे.
नेपाळी अधिकारी मृतदेहांमधून DNA नमुने घेऊन त्यांचे प्रोफाइल तयार करत आहेत. त्यानंतर बेपत्ता व्यक्तीच्या प्रथम श्रेणीतील नातेवाईकाच्या DNA प्रोफाइलशी त्याची तुलना केली जाईल. नेपाळ सरकारच्या माहितीनुसार यासाठी वडील, आई, मुलगा किंवा मुलगी यापैकी किमान एका व्यक्तीचा fresh blood sample वापरता येतो. परदेशात असलेल्या नातेवाईकांना त्यांच्या देशात DNA profiling करून त्याची soft copy नेपाळ पोलिसांकडे पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
DNA किंवा अन्य फॉरेन्सिक पुराव्यांबरोबरच मृत व्यक्तीचा पासपोर्ट किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र पडताळले जाईल. सर्व पुराव्यांच्या आधारे ओळख औपचारिकरीत्या निश्चित झाल्यानंतर भारतीय दूतावास आणि नेपाळी प्रशासन पुढील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करतील.
काठमांडूतील भारतीय दूतावासाने मदतीसाठी WhatsApp सुविधेसह तीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत: +977 985 131 6807, +977 970 910 7500 आणि +977 981 032 6117. DNA प्रक्रियेसंदर्भात नेपाळ पोलिसांचा संपर्क क्रमांक +977 9841 6160 95 आहे.
भारतीय दूतावास, काठमांडूची अधिकृत सूचना
मृत व्यक्तीची ओळख निश्चित झाल्यानंतर पासपोर्ट/ID पडताळणी आणि आवश्यक फॉरेन्सिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर भारतीय दूतावास नेपाळी अधिकाऱ्यांशी समन्वय साधेल. हँडओव्हर आणि रिलीजसंबंधी कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देणे आणि भारतात पाठवण्याची पुढील प्रक्रिया केली जाईल.
नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
नेपाळमधील या भीषण आपत्तीत अनेक मृतदेह दूरवर वाहून गेल्याने किंवा गंभीररीत्या खराब झाल्याने पारंपरिक पद्धतीने ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे DNA, फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक नोंदी, छायाचित्रे आणि अधिकृत ओळखपत्रे यांचा एकत्रित आधार घेऊन मृतांची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे.






