
Lahore Air Pollution News Today World Most Polluted City Lahore
वायुप्रदूषणाची समस्या आता केवळ भारतातील दिल्लीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शेजारील देश पाकिस्तानची अवस्था त्याहूनही भयावह झाली आहे. पाकिस्तानचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर मानले जाणारे लाहोर (Lahore Smog) पुन्हा एकदा जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. रविवारी सकाळी लाहोरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल ५३८ इतका नोंदवला गेला, जो आरोग्यासाठी ‘अतिशय धोकादायक’ श्रेणीत मोडतो. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, विषारी उत्सर्जन रोखण्यात सरकारी प्रशासनाला आलेले अपयश आणि बिघडत चाललेले पर्यावरणीय संतुलन यामुळे संपूर्ण पाकिस्तानात श्वसनाच्या संकटाची घंटा वाजू लागली आहे.
स्विस वायू गुणवत्ता निरीक्षण प्लॅटफॉर्म ‘आयक्यूएअर’ (IQAir) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीने सर्वांचीच झोप उडवली आहे. रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत लाहोरचा AQI ५३८ वर पोहोचला होता. या जागतिक यादीत लाहोर पहिल्या क्रमांकावर असून, १८० AQI सह पाकिस्तानचेच कराची शहर दुसऱ्या आणि १६२ AQI सह इजिप्तमधील कैरो तिसऱ्या स्थानी राहिले. लाहोर आणि दुसऱ्या क्रमांकावरील कराची यांच्यातील तफावत पाहता, लाहोरमधील हवा किती विषारी झाली आहे, याचा सहज अंदाज येतो.
हे पर्यावरणीय संकट केवळ लाहोर शहरापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला या विषारी धुक्याने (Smog) आपल्या विळख्यात घेतले आहे. IQAir च्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील १० सर्वाधिक प्रदूषित शहरी केंद्रांपैकी तब्बल ८ शहरे एकट्या पंजाब प्रांतातील आहेत.
यामध्ये लाहोर जिल्ह्यातील ‘काहना नौ’ (Kahna Nau) या भागात देशातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली असून, येथील AQI तब्बल ६०६ इतका भयानक होता. त्यापाठोपाठ लाहोर (५३८), बहावलपूर (५३६), सरगोधा (३९२) आणि गुजरानवाला (३४७) या शहरांचा क्रमांक लागतो. याशिवाय मुलतान, डेरा गाझी खान, स्कार्दू, फैसलाबाद आणि पेशावर या प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ताही अत्यंत खालावली आहे. या विषारी हवेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांचे जगणे कठीण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO : युक्रेनवर 400 ड्रोन हल्ल्यांदरम्यान रशियाची दोन क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये पडली; युरोप ‘कलम 5’ करणार का लागू?
अनियंत्रित वायुप्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी किती जीवघेणे ठरू शकते, याचे भीषण वास्तव जागतिक आरोग्य आकडेवारीतून समोर आले आहे. घराबाहेरील आणि घरातील वायुप्रदूषण हे जगभरातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण मानले जाते. या अदृश्य शत्रूमुळे दरवर्षी जगभरात अंदाजे ८१ लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी केवळ बाहेरील हवेतील अतिसूक्ष्म विषारी कणांमुळे (PM2.5) तब्बल ४७ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता, तेथील नागरिक एका मोठ्या आरोग्य आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून लाहोर शहर जागतिक प्रदूषण निर्देशांकात सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. शनिवारी संध्याकाळी येथील AQI २६६ नोंदवला गेला होता, जो ‘अतिशय अस्वस्थ’ श्रेणीत येतो. तत्पूर्वी शुक्रवारी पंजाबमधील अनेक शहरांवर दाट विषारी धुक्याची चादर पसरली होती, ज्यामुळे सकाळी ७ ते ८ दरम्यान लाहोरचा AQI ४६५ वर पोहोचला होता.
हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असल्याने पंजाब प्रांतीय प्रशासनाने सुरू केलेल्या ‘धुकेविरोधी मोहिमांचे’ (Anti-Smog Campaigns) अपयश चव्हाट्यावर आले आहे. नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. मात्र, दुसरीकडे लाहोर वाहतूक पोलिसांनी प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई केल्याचा दावा केला आहे.
लाहोरचे मुख्य वाहतूक अधिकारी सय्यद अब्दुल रहीम शिराझी यांनी शनिवारी माहिती दिली की, वाहतूक पोलिसांनी पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. या अंतर्गत प्रचंड धूर सोडणाऱ्या १४,६५३ वाहनांना चलन बजावण्यात आले आहे. तसेच, वाळू, माती आणि बांधकाम साहित्य ताडपत्रीने न झाकता वाहून नेणाऱ्या १०,३०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, खराब अवस्थेतील ३१,६१८ वाहनांना दंड ठोठावण्यात आला असून क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या तब्बल २,७२,७६० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली आहे.
याचबरोबर, पंजाब पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल विभागाने विटांच्या भट्ट्यांवरही मोठा बडगा उगारला आहे. १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत प्रांतभरातील विटांच्या भट्ट्यांच्या ८४,३७० तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये नियम मोडणाऱ्या १,४२९ भट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या, ९६८ भट्ट्या सील केल्या गेल्या आणि १,२४८ जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले. विशेषतः धुके सर्वात जास्त दाटण्याच्या काळात (१ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर) विभागाने २९,९९९ तपासण्या करून ५१९ भट्ट्या पाडल्या आणि ४९४ सील केल्या, तसेच १०१.४५ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड वसूल केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War : कोड 7700 आणि अबू धाबीमध्ये आपत्कालीन लँडिंग? इराणच्या दाव्याने जागतिक राजकारणात खळबळ
इतकी मोठी कारवाई होऊनही पाकिस्तानची हवा का सुधारत नाही, याचे उत्तर दीर्घकालीन आकडेवारीत दडलेले आहे. देशात पर्यावरणाच्या नियमांकडे वर्षानुवर्षे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले गेले आहे. २०२५ च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये PM2.5 या घातक कणांची सरासरी पातळी ६७.३ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकी नोंदवली गेली होती. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवून दिलेल्या ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर या सुरक्षित मर्यादेपेक्षा ही पातळी जवळपास १४ पट जास्त आहे. प्रदूषणाच्या या अत्यंत धोकादायक पातळीमुळे पाकिस्तानचा सरासरी AQI १५६ इतका राहिला असून, तो जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक बनला आहे. जोपर्यंत ठोस आणि दीर्घकालीन धोरणे राबवली जात नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानच्या जनतेला या विषारी हवेतून सुटका मिळणे कठीण दिसत आहे.
Ans: स्विस संस्थेच्या 'IQAir' अहवालानुसार, पाकिस्तानचे लाहोर (Lahore) हे जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले असून येथील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५३८ वर पोहोचला आहे.
Ans: पाकिस्तानमधील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांपैकी ८ शहरे एकट्या पंजाब प्रांतात आहेत. यामध्ये लाहोरमधील 'काहना नौ' येथे सर्वात खराब म्हणजेच ६०६ AQI नोंदवला गेला आहे.
Ans: जागतिक आरोग्य आकडेवारीनुसार, घराबाहेरील आणि घरातील वायुप्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी अंदाजे ८१ लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो.