Pakistan in tension due to 'mock drill' of war in India, PM Shahbaz Sharif called meeting in ISI headquarters
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला. भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. सुरुवातील भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकचा हल्ला केला. पाकिस्तानला सिंधू, चिनाब, आणि वुलर सरोवरातून मिळणार पाणी थांबवले. तसेच संभाव्य लष्करी कारवाईची देखील शक्यता आहे. दरम्यान भारत सरकराने 07 मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित केली आहे. यामुळे आधीच भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानात मोठा गोंधळ उडाला आहे.
दरम्यान पाकिस्तानमध्ये मॉक ड्रिलच्या आणि भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या हेडकॉर्टर्समध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि नौदल, वायुदल, भू-दलाचे प्रमुख उपस्थित होते.
या दरम्यान भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संभ्याव्य धोके आणि देशाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यलायाने निवेदन जारी केले असून यानुसार, भारताच्या आक्रमक आणि उकसवणाऱ्या कृतींना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. मुख्यत: पूर्ण सीमेवरील भारताच्या कारवाया लक्षात घेता पाकिस्तानने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यावर भर दिला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. शाहबाज शरीफ आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाने प्रादेशिक सुरक्षा, तसेच संभाव्य धोक्याचे स्वरुप, पारंपारिक लष्करी ताकद, युद्ध रणनीती आणि दहशतवादी नेटवर्कच्या माहितीचा तपशील घेतला आहे.
या बैठकीनंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ISI आणि पाकिस्तानी सैन्याचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, ISI राष्ट्रीय हिंताचे संरक्षण करण्यात आणि संकटाच्या काळात मदत करण्यास महत्वाची भूमिका बजावते. तसेच संपूर्ण देश आपल्या सैन्याच्या पाठिशी उभा असल्याचेही पंतप्रधान शाहबाज यांनी म्हटले
दरम्यान भारत सरकारने बुधवारी 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. या सिव्हिल मॉक ड्रिलमध्ये 244 जिल्ह्यांचा समावेश आहे. या मॉक ड्रिलचा उद्देश युद्ध, क्षेपणास्त्रे, हवाई हल्ले यांसारख्या आपत्कालीन परिस्थीतीत तोंड देण्यासाठी आणि नागरी संरक्षण तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे. यावेळी सायरन, ब्लॅकआउट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात येणार आहेत. 1971 नंतरचा हा भारतातील पहिलाच मोठा नागरी संरक्षण मॉक ड्रिल असणार आहे.