इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन
नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. हे युद्ध थांबावं, अशी जगातील सर्वच देशांची इच्छा आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधला. मोदींनी त्यांना ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा दिल्या.
पश्चिम आशियातील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की, हा सणासुदीचा काळ या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येईल. त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. हा सणासुदीचा काळ पश्चिम आशियामध्ये शांतता, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येईल. आम्ही या भागातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध करतो, जे प्रादेशिक स्थैर्याला धोका निर्माण करतात आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करतात.
हेदेखील वाचा : Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार
इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराणने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले. अशाप्रकारे, पंतप्रधान मोदींनी मुक्त नौकानयनाचे रक्षण करण्याची आणि सागरी मार्ग खुले व सुरक्षित ठेवण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेसाठी सागरी मार्गांची सुरक्षा आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. कोणताही व्यत्यय, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या भागांमध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो.
इराणकडूनही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर
दुसरीकडे, इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या दोन शहरांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. दक्षिण इस्रायलमधील दिमोना शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. तर अराद शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 50 हून अधिक लोक जखमी झाले.






