
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच येणार भारत दौऱ्यावर; बिक्स शिखर परिषदेत राहणार उपस्थित
मॉस्को : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावर्षी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषद ही एक वार्षिक बैठक आहे, ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचे नेते, तसेच नवीन सदस्य देशांचे नेते सहभागी होतात.
बिक्स शिखर बैठकीत आर्थिक सहकार्य, व्यापार, जागतिक प्रशासन आणि भू-राजकीय मुद्द्यांवर चर्चा होते. हे व्यासपीठ उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना धोरणांमध्ये समन्वय साधण्याची आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकत्रित आवाज उठवण्याची संधी देते.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यावर्षी भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत निश्चितपणे सहभागी होतील. शिखर परिषदेच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, TASS ने यापूर्वी ही शिखर परिषद १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाऊ शकते, असे म्हटले आहे.
ब्रिक्स शिखर परिषद म्हणजे काय?
ब्रिक्स शिखर परिषद म्हणजे BRICS या देशांच्या गटाची वार्षिक बैठक. BRICS म्हणजे: B – Brazil (ब्राझील)R – Russia (रशिया) I – India (भारत)C – China (चीन)S – South Africa (दक्षिण आफ्रिका) हे पाच देश मिळून ही परिषद होते. पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन आर्थिक, राजकीय आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते.
2009 मध्ये झाली होती पहिली ब्रिक्स परिषद
पहिली शिखर परिषद 2009 मध्ये रशियात झाली. दक्षिण आफ्रिका 2010 मध्ये सामील झाला. व्यापार, गुंतवणूक, विकास बँक, दहशतवाद विरोध, हवामान बदल, जागतिक शासनात सुधारणा या गोष्टींवर चर्चा केली जाते. मात्र, 2024 पासून इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि सौदी अरेबिया हे देशही BRICS+ म्हणून सामील झाले आहेत. जगातील मोठ्या विकसनशील देशांनी एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वाला पर्याय उभा करण्याचे हे एक व्यासपीठ आहे.