
Scotland Independence MoU UK Breakup News 2026
एकेकाळी ‘ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही’ अशी ख्याती असलेल्या युनायटेड किंगडमसमोर (britain) आता स्वतःचे अखंडत्व टिकवून ठेवण्याचे आजवरचे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. वेल्सची राजधानी कार्डिफ येथे पार पडलेल्या एका उच्चस्तरीय परिषदेत स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या तिन्ही देशांच्या प्रमुखांनी एकत्र येत एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. या कराराचा मुख्य उद्देश लंडनच्या वेस्टमिन्स्टर संसदेची मध्यवर्ती सत्ता झुगारून देणे आणि तिन्ही देशांच्या नागरिकांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळवून देणे हा आहे. ब्रिटनच्या (UK Breakup) आधुनिक इतिहासात हे तिन्ही देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या ऐतिहासिक करारावर स्कॉटलंडचे प्रथम मंत्री जॉन स्विनी, वेल्सचे प्रथम मंत्री रून ॲप इओरवर्थ आणि उत्तर आयर्लंडच्या प्रथम मंत्री मिशेल ओ’नील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याव्यतिरिक्त आयर्लंडच्या मुख्य विरोधी पक्ष ‘सिन फेन’च्या अध्यक्षा मेरी लो मॅकडोनाल्ड यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला. या करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटनच्या संसदेला किंवा कोणत्याही लंडनस्थित सरकारला या तीन राष्ट्रांची लोकशाही इच्छा दाबून ठेवण्याचा अधिकार नाही. अर्थशास्त्र, ऊर्जा संसाधने, युरोपीय युनियनशी संबंध आणि घटनात्मक भविष्य या चार महत्त्वाच्या क्षेत्रांत हे तिन्ही देश आता आपापसांत थेट सहकार्य करणार आहेत.
ब्रिटनमधील ताज्या राजकीय उलथापालथीमुळे वेस्टमिन्स्टरचे राजकारण हादरले आहे. स्कॉटलंडचे प्रथम मंत्री जॉन स्विनी यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांना थेट इशारा दिला आहे. स्विनी यांच्या मते, सध्याची प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पंतप्रधान बर्नहॅम यांनी ‘एकसंध ब्रिटनचे ते कदाचित शेवटचे पंतप्रधान असू शकतात’ हे कठोर वास्तव आता स्वीकारले पाहिजे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mexico: वाळवंटात हिरवा चमत्कार; 160 वर्षांनंतर बायसनच्या पुनरागमनाने पुन्हा बहरली मेक्सिकोची परिसंस्था
पंतप्रधान बर्नहॅम यांनी यापूर्वी असे विधान केले होते की, जर जनतेचा स्पष्ट कौल असेल तर सार्वमताचा विचार केला जाऊ शकतो; परंतु नंतर त्यांनी स्कॉटलंडमधील दुसरे सार्वमत फेटाळून लावले. तरीही, फुटीरतावादी नेत्यांनी या कराराद्वारे लंडन सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की वेस्टमिन्स्टरच्या संमतीची वाट न पाहता तिन्ही राष्ट्रे आपापल्या भविष्याचा मार्ग स्वतः निवडतील.
या संपूर्ण राजकीय नाट्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. डब्लिन दौऱ्यावर असताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना उघडपणे सांगितले की, त्यांना विखंडित आयर्लंडपेक्षा उत्तर आयर्लंड आणि आयर्लंड प्रजासत्ताकचे एकत्रीकरण झालेले पाहायला अधिक आवडेल. “एकसंध आयर्लंड ही एक अतिशय नैसर्गिक आणि उत्तम गोष्ट ठरेल आणि ती लवकरच घडली पाहिजे,” असे विधान ट्रम्प यांनी केले.
The right to decide our own futures is an exciting project. One filled with hope, ambition and opportunity. Today marks an historic moment as Sinn Féin, the SNP and Plaid Cymru come together to stand up for the interests of our nations and their right to independence. For the… pic.twitter.com/EusBsvFWiD — Mary Lou McDonald (@MaryLouMcDonald) September 14, 2026
credit – social media and Twitter
विश्लेषकांच्या मते, अमेरिकेत होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील मोठ्या आयरिश-अमेरिकन मतदारांना खूश करण्यासाठी ट्रम्प ही राजकीय भूमिका घेत आहेत. १९९८ मध्ये अमेरिकेचे तत्कालिक अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी ‘गुड फ्रायडे करारात’ महत्त्वाची मध्यस्थी करून अमेरिकेतील आयरिश समुदायाचा पाठिंबा मिळवला होता. आता ट्रम्पही त्याच मार्गाचा अवलंब करत उत्तर आयर्लंडच्या ब्रिटनपासून वेगळे होण्याच्या चळवळीला अप्रत्यक्षपणे बळ देत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
मे महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर ब्रिटनच्या प्रांतीय राजकारणात मोठे बदल झाले आहेत. वेल्समध्ये दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या लेबर पक्षाचा पराभव करत ‘प्लेड सायमरू’ (Plaid Cymru) हा स्वातंत्र्यवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आणि रून ॲप इओरवर्थ वेल्सचे प्रथम मंत्री बनले. सध्या स्कॉटलंडमध्ये ‘एसएनपी’ (SNP), उत्तर आयर्लंडमध्ये ‘सिन फेन’ (Sinn Féin) आणि वेल्समध्ये ‘प्लेड सायमरू’ सत्तेत आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या तिन्ही प्रांतांमध्ये स्वातंत्र्यवादी पक्ष सत्तेच्या शिखरावर असल्याने युनायटेड किंगडम विघटनाच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. या तिन्ही देशांनी पुन्हा युरोपीय युनियनमध्ये (EU) सामील होण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात ब्रिटन एकसंध राहणार की याचे चार तुकडे होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.