Sheikh Mujibur Rahman is no longer the 'Father of the Nation' of Bangladesh, Yunus' interim government abolished the status
ढाका: सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा खटला दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय गन्हे न्यायाधिकरणात खटला दाखल करण्यात आला असून यावर सुनावणी सुरु आहे. याच वेळी बांगलादेशच्या अंतिरम सरकारने शेख हसीना यांना आणखी एक झटका दिला आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतरिम सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
अंतरिम सरकारने शेख हसीना यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना दिलेला राष्ट्रपिता दर्जा रद्द केला आहे. यामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित कायद्यात सुधारणा करुन हा बदल करण्यात आला असल्याचे सांगिरले आहे. बुधवारी स्थानिक वृत्तसंस्थांना याची माहिती देण्यात आली. याशिवाय काही दिवसांपूर्वी मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारने चलनी नोटांमधून शेख मुजीबुरहमान यांचे चित्र देखील काढून टाकले होते. या निर्णयानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेशच्या सरकारी वृत्तसंस्था ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम सरकारने राष्ट्रीय स्वातंत्र्य सैनिक परिषद कायद्यात सुधारणा केली आहे. या सुधारणांतर्गत स्वातंत्र्य सैनिकाची व्याख्या बदलण्यात आली आहे. बांगलादेशच्या कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने मंगळवारी रात्री दुरुस्तीचा अहवाल जारी केला. या अहवालात, कायद्यात राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान या शब्दांमध्येही बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर कायद्यात पूर्वी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे नाव लिहिलेले होते, हे नावही पुसून टाकण्यात आले आहे.
सरकारने जारी केलेल्या नवीन अहवालात, स्वातंत्र्य सैनिकाच्या व्याख्येत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. सुधारित कायद्यानुसार, युद्धकाळात निर्वासित सरकार, मुजीबनगर सरकारशी संबंधित सर्व संसद सदस्य आणि आमदार यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. नवीन सुधारित व्यख्येनुसार, स्वातंत्र्य संग्रामातील सहयोगी अशी श्रेणी देण्यात येणार आहे.
तसेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या चलनातही बदल केला आहे. याअंतर्गत बांगादेशचे संस्थापक मुजीबुरहमान यांचे चित्र चलनातून काढून टाकण्यात आले आहे. याऐवजी चलनावर हिंदू मंदिरांची आणि बौद्ध मंदिरांची प्रतिमा असणाऱ्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. सध्या बांगलादेशच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे.