SriLanka : श्रीलंकेतील २०१९ ईस्टर आत्मघाती हल्ला प्रकरणात ऐतिहासिक निकाल; १५ दहशतवाद्यांना २२० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दक्षिण आशियाई राजकारणाला आणि सुरक्षेला हादरवून सोडणाऱ्या २०१९ मधील श्रीलंकेतील भीषण ईस्टर आत्मघाती हल्ला प्रकरणात अखेर न्याय मिळाला आहे. श्रीलंकेच्या (Sri Lanka ) कोलंबो उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने (Trial-at-Bar) या ऐतिहासिक खटल्याचा निकाल देत १५ आरोपींना प्रत्येकी २०० ते २६० वर्षांच्या (सरासरी २२० वर्षे) सक्तमजुरीच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २७० हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या आणि ५०० हून अधिक लोकांना जखमी करणाऱ्या या भयंकर दहशतवादी कृत्याबाबत पाच वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे.
न्यायमूर्ती नवरत्ने मरासिंघे, न्यायमूर्ती रामनाथन कन्नन आणि न्यायमूर्ती सुजीव निस्संका यांच्या तीन सदस्यीय विशेष उच्च न्यायालयीन खंडपीठाने या प्रकरणावर अंतिम निकाल वाचन केले. न्यायालयाने एकूण २४ आरोपींपैकी १५ जणांना मुख्य कट रचणे, दहशतवादी कारवायांना मदत करणे, हत्या करणे आणि स्फोटके बाळगणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. उर्वरित ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १५ जणांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत.
२१ एप्रिल २०१९ रोजी ईस्टर संडेच्या पवित्र दिवशी श्रीलंकेमध्ये एकामागून एक भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. आयसिस (ISIS) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या ‘नॅशनल थोहीद जमात’ (NTJ) या स्थानिक इस्लामिक अतिरेकी संघटनेच्या ९ आत्मघाती बॉम्बर्सनी हे हल्ले केले होते. दहशतवाद्यांनी कोलंबो आणि परिसरातील तीन प्रमुख कॅथोलिक चर्च आणि तीन आलिशान पंचतारांकित हॉटेल्सना आपले लक्ष्य बनवले होते. या भीषण नरसंहारात ११ भारतीय नागरिकांसह एकूण २७० निरपराध लोकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ५०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
या खटल्याची सुनावणी अत्यंत क्लिष्ट आणि मोठी होती. अभियोजन पक्षाने (Prosecution) न्यायालयात तब्बल २,३०९ साक्षीदारांची तपासणी केली. सर्व आरोपींवर एकूण २३,२७० वेगवेगळे आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी ‘नौफर मौलवी’ (Mohammadu Ebrahim Mohammadu Naufer) यालाही मुख्य कट रचल्याबद्दल दोषी ठरवले असून त्याला २२० वर्षांच्या कठोर शिक्षेची घोषणा केली आहे. नौफर मौलवी याने आपल्या धार्मिक भाषणांद्वारे इतर तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर ढकलल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
श्रीलंकेतील या भयानक आत्मघाती हल्ल्याचे धागेदोरे भारताशी आणि भारतातून फरार झालेल्या कट्टरपंथी धर्मोपदेश झाकीर नाईकशी जोडले गेले होते. हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या सुरक्षा दलांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. अटक करण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांनी आणि संशयितांनी सुरक्षा यंत्रणांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले होते की, ते भारतातून फरार झालेला वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याचे ऑनलाइन व्हिडिओ आणि प्रक्षोभक भाषणे पाहून कट्टरपंथी बनले होते आणि त्यानंतरच ते दहशतवादी संघटनेत सामील झाले. झाकीर नाईकवर भारतातही कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर तो मलेशियामध्ये पळून गेला होता आणि तेव्हापासून तो तिथेच वास्तव्यास आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Ayurveda Day : केवळ उपचार नाही तर संतुलित जीवन जगण्याचे शास्त्र; जाणून घ्या आयुर्वेदाचे मानवी जीवनातील स्थान
या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक आठवडे आधीच श्रीलंकेच्या प्रशासनाला अतिशय स्पष्ट आणि अचूक पूर्वसूचना दिली होती. मात्र, ही अत्यंत संवेदनशील गुप्त माहिती मिळूनही योग्य ती खबरदारी न घेतल्याबद्दल आणि हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आणि तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले होते. या घटनेमुळे श्रीलंकेच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी उघड्या पडल्या होत्या आणि त्याचा मोठा फटका देशाच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला बसला होता. ५ वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे मृतकांच्या नातेवाईकांना व पीडितांना अंशतः दिलासा मिळाला आहे.






