हिंदू सणाचा अपमान केल्याबद्दल बालीमध्ये स्विस पर्यटकाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इंडोनेशियातील (Indonesia) जगप्रसिद्ध बाली बेटावर स्थानिक हिंदू संस्कृती, परंपरा आणि धार्मिक भावनांचा अवमान केल्याची एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. बाली येथील पवित्र ‘न्येपी’ (Nyepi) सणादरम्यान लादलेल्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करून सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या लुसियन अँड्रिन जेगरगेन (Lucian Andrin Zgraggen) या २६ वर्षीय स्विस पर्यटकाला स्थानिक न्यायालयाने १ वर्षाच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. व्यवसायाने बांधकाम कामगार असलेल्या या परदेशी पर्यटकाच्या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती.
प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, बालीमध्ये दरवर्षी ‘न्येपी’ हा पारंपरिक आणि अत्यंत पवित्र सण साजरा केला जातो, ज्याला ‘शांततेचा दिवस’ (Day of Silence) म्हणून ओळखले जाते. या सणादरम्यान संपूर्ण बेटावर २४ तासांसाठी कडक नियम लागू असतात. या काळात सर्व व्यावसायिक उपक्रम, प्रवास, उघड्यावर फिरणे आणि विजेचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी असते. अगदी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इंटरनेट सेवा देखील बंद ठेवली जाते. हे नियम स्थानिक नागरिकांसह सर्व परदेशी पर्यटकांनाही तितकेच तंतोतंत लागू असतात.
A Swiss tourist has been sentenced to one year in prison in Bali for social media posts insulting the island’s sacred Day of Silence. Luzian Andrin Zgraggen posted videos of himself outdoors during Nyepi and made profane comments that authorities say insulted Hindu tradition. pic.twitter.com/BZ9gEXXg3a — Al Jazeera English (@AJEnglish) August 20, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
हॉटेल कर्मचाऱ्यांनी न्येपी सणाचे गांभीर्य आणि नियमावली आधीच समजावून सांगितलेली असतानाही, आरोपी पर्यटकाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तो चोरट्या मार्गाने बाहेर पडला आणि निर्जन समुद्रकिनार्यावर जाऊन त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्याने बालीच्या या पवित्र परंपरेची खिल्ली उडवत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला.
घटना समोर आल्यानंतर बाली पोलिसांनी तातडीने सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने तपास चक्र फिरवून आरोपी पर्यटकाला शोधून काढले आणि त्याला अटक केली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने भुकेमुळे आणि रेस्टॉरंट्स बंद असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचा दावा केला आणि स्थानिक नागरिकांची जाहीर माफी मागितली. परंतु, न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, एखाद्या देशात प्रवास करताना तेथील धार्मिक व सांस्कृतिक नियमांची माहिती असणे ही पर्यटकाची जबाबदारी आहे. कोणत्याही धार्मिक परंपरेचा असा जाहीर अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत न्यायालयाने त्याला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाली बेटावर परदेशी पर्यटकांच्या वाढत्या बेजबाबदार वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाली प्रशासन आणि तेथील स्थानिक नागरिक आपल्या धार्मिक वारशाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा मंदिरांमध्ये अयोग्य वर्तन करणाऱ्या अनेक परदेशी पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना देशातून हद्दपार (Deport) करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जागतिक स्तरावर असा संदेश गेला आहे की, पर्यटन म्हणजे स्थानिक संस्कृतीचा अवमान करण्याचा परवाना नव्हे.






