Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर ३ प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
थायलंडच्या (thailand) दक्षिणेकडील प्रांतांमध्ये शनिवारी रात्री एकापाठोपाठ एक घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट, जाळपोळ आणि सशस्त्र हल्ल्यांच्या मालिकेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नाराथिवत, याला आणि पट्टानी या तीन अतिसंवेदनशील भागांमध्ये दंगलखोरांनी घडवून आणलेल्या या पूर्वनियोजित हिंसाचारानंतर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून कडक संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून संपूर्ण प्रभावित भाग सील करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अंदाजे ३० सशस्त्र हल्लेखोरांनी नराथिवत प्रांतातील बँगोर प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीवर थेट हल्ला चढवला. हल्लेखोरांनी तेथील सुरक्षा रक्षकांना ओलीस ठेवून दोऱ्यांनी बांधले आणि संपूर्ण सरकारी इमारतीला आग लावून दिली. यानंतर दंगलखोर घटनास्थळावरून एक पिकअप ट्रक पळवून नेण्यात यशस्वी झाले, जो पुढे जळालेल्या अवस्थेत आढळला. या भीषण घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नराथिवत प्रांतात रविवार सकाळी ६ वाजेपर्यंत कडक सुरक्षा संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले. संचारबंदीदरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
नाराथिवत प्रांतातील विविध तालुक्यांमध्ये किमान ११ ठिकाणी बॉम्बस्फोट आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. एका भीषण कार बॉम्बस्फोटात दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ नाराथिवतच नव्हे, तर शेजारील याला प्रांतातही उपद्रवी तत्वांनी धुमाकूळ घातला. तेथे अनेक सरकारी वाहने पेटवून देण्यात आली तसेच एका महत्त्वाच्या दूरसंचार (Telecommunication) टॉवरला लक्ष्य करण्यात आले. सुरक्षा दलांच्या वाहनांचा पाठलाग रोखण्यासाठी उपद्रविकांनी रस्त्यांवर लोखंडी खिळे पसरवून वाहतूक ठप्प करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, पट्टानी प्रांतात सशस्त्र टोळक्याने अंधाधुंद गोळीबार करत दहशत पसरवली. बांग पु चौकाजवळ एक संशयास्पद वस्तू ठेवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. या गोंधळाचा फायदा घेत उपद्रविकांनी प्रसिद्ध ‘सेव्हन-इलेव्हन’ (7-Eleven) स्टोअरमध्ये लूटमार केली अन् त्याला आग लावली. यानंतर दंगलखोरांनी महामार्ग ४२ वर धाव घेत जुने टायर पेटवून दिले आणि रस्ता पूर्णपणे रोखून धरला. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध युक्रेनला मिळणार ‘कवचकुंडल’; फ्रान्स पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली
घटना घडताच थायलंडच्या लष्कराच्या चौथ्या ब्रिगेडने आणि स्थानिक पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे. बाधित भागात फॉरेन्सिक टीम दाखल झाल्या असून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने, या मालिकानिहाय हल्ल्यांमध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर करून कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या संघटित हल्ल्यांमागे कोणत्या स्थानिक बंडखोर गटाचा हात आहे, याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे.






