‘अमेरिका कॅनडात विलिन होणे शक्यच नाही’; ट्रुडोंनी नाकारली डोनाल्ड ट्रम्प यांची ऑफर
ओटावा: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी लवकरच विराजमन होतील. दरम्यान त्यांनी निवडणुक जिंकल्यानंतर नेक वादग्रस्त विधाने केली ज्यामुळे ते सतत चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याची त्यांची ऑफर. त्यांनी अनेक वेळा कॅनडाला ही ऑफर दिली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, जस्टिन ट्रुडो यांनी त्यांचा हा प्रस्ताव नाकारला आहे.
कॅनडा अमेरिकेचा भाग बनण्याची कोणतीही शक्यता नाही
यासंबंधित एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, कॅनडा अमेरिकेचा भाग बनण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन्ही देश आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात परस्परांच्या प्रमुख भागीदारांमुळे लाभ घेत आहेत आणि हे संबंध असंच टिकवले जातील.
There isn’t a snowball’s chance in hell that Canada would become part of the United States.
Workers and communities in both our countries benefit from being each other’s biggest trading and security partner.
— Justin Trudeau (@JustinTrudeau) January 7, 2025
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी देखील ट्रम्प यांना ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, कॅनडा अशा धमक्यांमुळे मागे हटणारा नाही. ट्रम्प यांची कॅनडाबद्दलची समज अत्यंत कमकुवत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आमची अर्थव्यवस्था आणि जनता दोन्ही मजबूत आहेत, आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत,” असे जोली म्हणाल्या.
काय म्हणाले ट्रम्प?
दरम्यान, ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये एका कार्यक्रमात कॅनडाच्या लष्करी खर्चावर टीका केली होती. त्यांनी म्हटले की, कॅनडाकडे लहानसे लष्कर आहे आणि ते अमेरिकेच्या सैन्यावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, कॅनडावर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य शक्तीचा वापर केला जाणार नाही, तर आर्थिक शक्तीचा वापर करण्यात येईल. याआधी ट्रम्प यांनी ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतरही कॅनडाला अमेरिकेत सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी असा दावा केला होता की, कॅनडाचे अस्तित्व टिकवण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची वादग्रस्त विधाने
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ब्रिक्स देशांना अमेरिकन डॉलरऐवजी इतर चलनात व्यापार केल्यास 100% कर लागू करण्याची धमकी दिली होती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून दोन्ही देश स्वतंत्र राहून परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.