युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर
कीव: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय बहुमताने विजय झाला. आता ट्रम्प यांच्या विजयानंतर युक्रेनने रशियावरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने मध्य रशियामधील शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले आहेत. युक्रेनच्या सुरक्षा अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ड्रोनने मॉस्कोच्या दक्षिणेस 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुला प्रदेशातील अलेक्सिंस्की शस्त्रास्त्रा कारखान्यावर हल्ला केला.
रशियाच्या लष्करी औद्योगिक क्षेत्राला गंभीर धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामध्ये गनपावडर, दारूगोळा आणि अन्य शस्त्रे तयार करण्यात येतात. यामुळे युक्रेनने या कारखान्याला लक्ष्य करत, रशियाच्या लष्करी औद्योगिक क्षेत्राला गंभीर धक्का दिला आहे. युक्रेनने युद्धसामग्री उत्पादक कारखान्यांवर हल्ले करण्याचा आरोप स्वीकारला आहे. यामुळे रशियाची युक्रेनविरुद्ध दहशत निर्माण करण्याची क्षमता मर्यादित होईल, असे युक्रनेच्या अधिकार्यांनी सांगितले.
हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट नाही
अलेक्सिंस्की कारखान्यावर झालेल्या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र, यामुळे रशियाच्या युद्धसज्जतेला मोठा फटका बसू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सात विविध प्रदेशांमध्ये 50 युक्रेनियन ड्रोन पाडले. युक्रेनविरुद्धच्या युद्धाचा 1,000 वा दिवस लवकरच येत असून, युक्रेनच्या लष्कराला युद्धभूमीवर बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न रशिया करीत आहे.
रशियाच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर
युक्रनीयन सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनवर केलेल्या रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनमधील गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. पूर्व डोनेस्तक भागात रशियाचे सैन्य सतत हल्ले करत आहे. रशियन सैन्याने युक्रेनियन संरक्षण रेषा तोडत हवाई बॉम्ब तसेच तोफखान्याच्या हल्ले केले. यामुळे अनेक शहरे आणि गावे नष्ट झाली आहेत. याच हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून युक्रेनने रशियावर हल्ला केला आहे.
कारखान्यांवरील हल्ल्यांमुळे युद्ध परिस्थिती युक्रेनच्या बाजूने बदलेल
युक्रेनच्या लष्करी अधिकार्यांच्या मते, रशियातील लष्करी सुविधा, गोदामे आणि एअरफील्डवर होणारे हल्ले मॉस्कोच्या सैन्याच्या रसद आणि पुरवठ्याला मोठा अडथळा ठरू शकतात. सप्टेंबरपासून युक्रेनने रशियाच्या विविध शस्त्रास्त्र गोदामांवर लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे सतत हल्ले केले आहेत, यामुळे युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूने स्थिती बदलण्यास मदत होईल, असा विश्वास युक्रेनियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.