US-India Tariff War Final talks begin between India and the US to find a solution
नवी दिल्ली: भारत-अमेरिकामध्ये व्यापाराशी संबंधित चर्चांना वेग आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 एप्रिलपासून लागू होणाऱ्या रेसिप्रोकल टॅक्समुळे भारताची चिंता वाढली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे. भारत सरकार आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची 25 ते 29 मार्च दरम्यान बैठक होणार असून ही चर्चा यशस्वी होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच भारत-अमेरिकेमधील टॅरिफ युद्धावर पूर्णविराम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (24 मार्च) भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही मंत्र्यांनी पुढील महिन्यांपासून अमेरिकेकडून लागू होणाऱ्या रेसिप्रोकल टॅक्स आणि संभाव्य करारांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारताच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान दोन्ही देश सध्या द्विपक्षीय व्यापर कराराच्या चौकटीवर काम करत असून लवकरच दोन्ही देशांमध्ये बैठक होईल.
अमेरिकेन दूतावासाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांचे एक शिष्ठमंडळ 25 ते 29 मार्च दरम्यान भारत भेटीला व्यापर संबंधांवर चर्चा करण्यासाठी येणार आहे. या गटाचे नेतृत्व दक्षिण मध्य आशियाई सहाय्यक अमेरिकन व्यापर प्रतिनिधी ब्रेडन लिंच करणार आहेत. या बैठकीत भारतासोबत उत्पादक आणि संतुलित व्यापर संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहील.
दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारताचे व्यापर मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापरविषयक संबंधांवर भर दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅक्समुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेच वातावरण आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान व्यापर कराराच्या पहिल्या टप्प्यावर सप्टेंबर 2025 पर्यंत काम करण्याचा मान्य केले होते. सध्या भारत-अमेरिका 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापर 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्नांवर काम करत आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापर कराराच्या चौकटीत अंतिम चर्चा करण्याच्या कक्षेत आहे.
दरम्यान एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, पण भारत अमेरिकेवर जास्त कर लादतो. जगातील सर्वात जास्त शुल्क लादण्याऱ्या देशांमध्ये भारताचे नाव येते. ट्रम्प यांनी टॅरिफ किंग म्हणून भारतावर टीका केली आहे.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत अमेरिकन उत्पादनांवर जास्त कर लादतो, यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यापार करणे कठीण होते. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारतात अनेक गोष्टी विकत घेणे कठीण आहे. मात्र ट्रम्प यांनी एकीकडे भारताकडून अमेरिकन उत्पादनांवरील कर कमी करण्याची आशा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भारतावरील रेसिप्रोकल टॅक्स अमेरिका लागून करणारच आहे असे त्यांनी म्हटले आहे.