
US Iran war August 2026 CENTCOM strikes Iran Chabahar
अमेरिका आणि इराण ( US-Israel Iran War) यांच्यातील लष्करी तणावाने पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुप्त मुत्सद्दी आणि राजनैतिक चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने इराणच्या मुख्य भूमीवरील महत्त्वाच्या लष्करी तळांवर आणि सागरी पट्ट्यावर भीषण बॉम्बहल्ला चढवला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या निमलष्करी दलाच्या ठिकाणांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर इराणकडून होत असलेले हल्ले आणि अमेरिकन सैन्याला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून ही अत्यंत आक्रमक मोहीम राबवण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
इराणी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, अमेरिकन युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी दक्षिण आणि आग्नेय इराणमधील सागरी किनारपट्टीवर एकाच वेळी अनेक हल्ले केले. चाबहार, बंदर अब्बास, कोनारक, केशम बेट, जास्क, सिरिक आणि मिनाब यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणांवर हे हवाई हल्ले झाले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर संपूर्ण दक्षिण इराणचा किनारी भाग प्रचंड स्फोटांच्या आवाजाने हादरून गेला. सेंटकॉमच्या मते, आयआरजीसीच्या हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense Sites), रडार स्टेशन, नौदल तळ, सागरी सुरुंग (Sea Mines) टाकण्याची क्षमता असलेली ठिकाणे आणि दळणवळण केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal flood: नेपाळमध्ये पुरामुळे 1,127 जणांचा दुर्दैवी अंत, हजारो बेपत्ता; भारत आणि अमेरिकेकडून आपत्कालीन मदत सामग्री दाखल
अमेरिकेच्या या भीषण कारवाईनंतर इराणनेही तात्काळ आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आयआरजीसीने जॉर्डनमधील अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या ‘कॅम्प टिटिन’ (Camp Titin) या तळावर तसेच प्रिन्स हसन एअरबेसवर अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय इराकच्या इरबिल भागातील अमेरिकन लष्करी तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. कुवेतच्या हवाई हद्दीतही संशयास्पद इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आल्याने तेथील संरक्षण यंत्रणा सतर्क झाली असून सायरनचे आवाज घुमू लागले आहेत. जॉर्डनच्या लष्कराने इराणकडून आलेली बहुतांश बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला असून, सुदैवाने या प्रतिहल्ल्यात अमेरिकन सैनिकांची कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
🚨 BREAKING NEWS: Iranian forces have targeted US bases in Jordan with heavy ballistic missiles in response to alleged attacks on Larak Island. This retaliatory action has further escalated tensions in the region. pic.twitter.com/m1v7fgbsev — Iran Reports (@IranReportsX) September 1, 2026
credit – social media and Twitter
गेल्या महिनाभरापासून दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात संथ शांतता दिसून येत होती, परंतु होर्मुझच्या सामुद्रधुनीत खनिज तेलाच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. जगातील एकूण तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक याच होर्मुझच्या सामुद्रधुजीतून होते. इराणने या मार्गावर सागरी सुरुंग लावून तेल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या ताज्या लष्करी चकमकांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ४ डॉलरहून अधिक वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मोठ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal flood: नेपाळमध्ये पुरामुळे 1,127 जणांचा दुर्दैवी अंत, हजारो बेपत्ता; भारत आणि अमेरिकेकडून आपत्कालीन मदत सामग्री दाखल
या लष्करी घडामोडींनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तसेच सोशल मीडियावर इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “जर इराणने आमच्या या रास्त कारवाईला पुन्हा लष्करी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही असा हल्ला करू ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. आमची सर्वात मोठी आणि विनाशकारी कारवाई अजून बाकी आहे, आणि ती जेव्हा होईल तेव्हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्व धोक्यात येईल.”
इराणशी सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की इराणला सध्या करार करायचा आहे, पण त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. तरीही राजनैतिक तोडगा काढण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले नाहीत. दुसरीकडे इराणच्या लष्करी वक्तव्यात अमेरिकेला या हल्ल्याचा मोठा पश्चात्ताप करावा लागेल असा दावा करण्यात आला आहे. सध्या संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती अत्यंत तीव्र झाली असून, येत्या काही तासांत दोन्ही बाजूंनी काय पावले उचलली जातात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.