
दुचाकी विश्वात ज्या एका नावाचा दबदबा गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे, ते नाव म्हणजेच ‘सुझुकी हायाबुसा’. २००४ मध्ये आलेल्या प्रसिद्ध ‘धूम’ चित्रपटामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक तरुणाच्या मनात या बाईकने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आता या जपानी बाईक उत्पादक कंपनी सुझुकीने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली नवी २०२७ सुझुकी हायाबुसा सादर केली आहे. कंपनीने या फ्लॅगशिप हायपरबाईकमध्ये काही भन्नाट कॉस्मेटिक बदल केले असून, सोबतच एक अत्यंत कडक ‘स्पेशल एडिशन’ व्हेरियंटही लॉन्च केले आहे. या क्रेझी बाईकबद्दल आज जाणून घेऊयात,
नव्या रंगांची जादू आणि इंटरेस्टिंग ‘स्पेशल एडिशन‘
२०२७ सुझुकी हायाबुसाच्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने यात दोन स्टँडर्ड रंग दिले आहेत, ज्यामध्ये ब्लॅक व्हील्ससह ‘ग्लास स्पार्कल ब्लॅक’ आणि ‘मेटॅलिक रिफ्लेक्टिव्ह ब्लू’ या रंगांचा समावेश आहे. याशिवाय, ज्यांना रस्त्यावर फिरताना सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कंपनीने एक विशेष ‘स्पेशल एडिशन’ ट्रिम आणली आहे. ही स्पेशल एडिशन ‘पर्ल ब्रिलियंट व्हाईट’ आणि ‘मेटॅलिक ओर्ट ग्रे’ रंगात लाल रंगाच्या ग्राफिक्ससह सजवली आहे. यात गाडीच्या रंगाशी जुळणारे सोलो सीट काऊल, काळ्या रंगाचे एक्झॉस्ट एंड कॅप्स, इंधन टाकीवर ३D सुझुकी लोगो, व्हील्सवर रेड हायलाईट्स आणि सोन्यासारखे चमकणारे फ्रंट ब्रेक रोटर्स व चेन ॲडजस्टर्स देण्यात आले आहेत.
६ व्या गिअरमध्ये ३०० चा वेग; अफाट इंजिन क्षमता
या बाईकच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कारण हायाबुसाचे इंजिन आधीच अतिशय शक्तिशाली आहे. यात जुनेच परिचयाचे १,३४०cc चे, लिक्विड-कोल्ड, इनलाईन फोर-सिलेंडर इंजिन मिळते, जे १९० bhp ची अफाट पॉवर आणि १५० Nm चा वादळी टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टरसह येते. या इंजिनची ताकद इतकी जबरदस्त आहे की, रायडर गिअर न बदलता थेट ६ व्या गिअरमध्ये ताशी ६० किमीपासून ३०० किमीपर्यंतचा वेग सहज गाठू शकतो, जे हायाबुसाचे मूळ वैशिष्ट्य आहे.
सुरक्षेचा कडक बंदोबस्त आणि हाय-टेक इलेक्ट्रॉनिक्स
सुरक्षेच्या आणि रायडिंगच्या बाबतीत ही बाईक खूप प्रगत आहे. यात ‘सुझुकी इंटेलिजेंट राईड सिस्टीम’ दिलेली आहे, ज्यामध्ये मल्टिपल राईड आणि पॉवर मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि हिल होल्ड कंट्रोल यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळतात. बाईकची मूळ रचना मजबूत ॲल्युमिनियम ट्विन-स्पार फ्रेमवर आधारित असून दोन्ही बाजूंना KYB चे सस्पेन्शन युनिट्स आहेत. ब्रेकिंगसाठी यात शक्तिशाली ब्रेंबो स्टाईलमा कॅलिबर्ससह मोठे डिस्क ब्रेक्स आणि कॉर्नरिंग ABS सह ड्युअल-चॅनल ABS ची सुविधा देण्यात आली आहे.
किंमत आणि भारतातील लाँच
सध्या भारतात सुझुकी हायाबुसाची एक्स-शोरूम किंमत १८.०५ लाख रुपये आहे. सुझुकीचा भारतात असणारा इतिहास आणि जुनी पद्धत पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केलेले हे २०२७ चे नवीन आकर्षक रंग आणि स्पेशल एडिशन मॉडेल येत्या काही महिन्यांतच भारतीय बाजारातही पाहायला मिळू शकते. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हायाबुसाची एक नवी क्रेझ पाहायला मिळणार, यात शंका नाही!