काही दुचाकी अशा असतात ज्या केवळ चालवण्यासाठी नाही, तर रस्त्यावर धाक-दरारा निर्माण करण्यासाठी बनवल्या जातात. अमेरिकन मोटरसायकल ब्रँड ‘बॉस हॉस’ याच टाईपमध्ये येतो. १९९० च्या दशकापासून ही कंपनी दुचाकींमध्ये थेट Chevrolet कारचे अवाढव्य V8 इंजिन बसवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. २०२६ साठी या ब्रँडने आणखी एक पाऊल पुढे टाकत आपल्या ‘क्रूझर’ मॉडेलमध्ये एका प्रचंड मोठ्या इंजिनचा समावेश केला आहे.
कारपेक्षाही दांडगे इंजिन आणि भयंकर ताकद
या बाईक मधील सर्वात मोठा बदल म्हणजे यात ४९६ क्युबिक-इंच म्हणजेच तब्बल ८,१२७cc (८.१-लिटर) चे प्रचंड मोठे बिग-ब्लॉक V8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल ६०० PS ची अफाट पॉवर आणि ७७२ Nm चा क्रेझी टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे अनेक लक्झरी आणि सुपर कार्सही या बाईकसमोर फिक्या वाटू लागतात. विशेष म्हणजे या क्रूझर बाईकमध्ये आता ग्राहकांसाठी ४ वेगवेगळ्या V8 इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सर्वात लहान इंजिन ६.२-लिटरचे असून अगदी १०-लिटर क्षमतेच्या इंजिनचा पर्यायही कंपनीने दिला आहे.
कावासाकीच्या 5 सर्वात क्रेझी ‘लिमिटेड एडिशन’ बाईक्स! हा आहे सुपरबाईक विश्वातील दुर्मिळ खजिना
मोठ्या वजनाचा हत्ती आणि सेमी-ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
नवीन इंजिन व्यतिरिक्त या बाईकची मूळ रचना पूर्वीसारखीच ठेवण्यात आली असून, यात मजबूत स्टील फ्रेम वापरली गेली आहे. कारचे इंजिन असल्यामुळे या बाईकचे एकूण वजन तब्बल ५५६ किलो आहे. ही दांडगी शक्ती मागच्या चाकापर्यंत पोहोचवण्यासाठी यात दोन-स्पीड सेमी-ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलेले आहे, तसेच नेहमीच्या क्लच ऐवजी टॉर्क कन्व्हर्टरचा वापर करण्यात आला आहे. बाईकचे प्रचंड वजन आणि आकार पाहता, ट्रॅफिकमध्ये किंवा पार्किंगमध्ये मागे घेताना अडचण येऊ नये म्हणून कंपनीने यात विशेष ‘रिव्हर्स गिअर’ची सुविधा दिली आहे.
इंधनाची टाकी आणि मायलेजचा हिशोब
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बॉस हॉस क्रूझरमध्ये ३२.१७ लिटरची मोठी इंधन टाकी देण्यात आली आहे. या बाईकच्या मायलेजचा विचार केला तर १०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी हिला अंदाजे ९.४ ते १३ लिटर पेट्रोल लागते. म्हणजेच एकदा टाकी पूर्ण भरल्यानंतर निवडलेले इंजिन आणि रायडिंग स्टाईलनुसार ही बाईक २५० ते ४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकते. कंपनीने २०२६ च्या लाईनअपमधून आपले ‘सुपर स्पोर्ट’ मॉडेल बंद केले असून, आता बाजारात केवळ ‘क्रूझर’ आणि ‘बॅगर’ हे दोनच मॉडेल्स उपलब्ध असतील.
किंमत आणि निष्कर्ष
अमेरिकन V8 इंजिनची ताकद आणि रस्त्यावरील राजासारखा रावडी लुक देणाऱ्या या २०२६ Boss Hoss Cruiser ची किंमत सुमारे $७१,००० म्हणजेच भारतीय चलनात तब्बल ६१ लाख रुपयांच्या आसपास आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून ही बाईक सर्वसामान्यांसाठी नसली, तरी जगात ज्यांना सर्वात वेगळे, अवाढव्य आणि प्रचंड शक्तिशाली काहीतरी चालवायचे आहे, अशा शौकिनांसाठी ही एक अत्यंत ‘रापचिक’ आणि एकमेव पर्याय ठरणारी मोटरसायकल आहे,अस म्हणायला हरकत नाही.






