असा विक्रमी चित्रपट तुम्हालाही माहित्येय, यशराज फिल्म्स बॅनरचा, यश चोप्रा निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आजच्या डिजिटल युगाच्या भाषेत डीडीएलजे. २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला.
मुंबईत मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते (तोपर्यंत आणि त्यानंतर काही वर्षे मेन थिएटरचा फंडा कायम होता. तो ९० टक्के प्रमाणात पिक्चरच्या स्वरुपानुसार असे. तो रंजक विषयच वेगळा.)
तेथे दिवसा तीन खेळ याप्रमाणे प्रवास केल्यावर हा चित्रपट मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि एकेक वर्ष करत करत पंचवीस वर्षानंतरही तो सुरुच आहे. अबब म्हणावा असाच हा विक्रमी मुक्काम. कोरोना प्रतिबंधक काळात हे खेळ थांबले होते इतकेच.
डीडीएलजे प्रदर्शित व्हायच्या वेळचे वातावरण कसे होते? अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी आजूबाजूचे सामाजिक सांस्कृतिक वातावरण महत्वाचे ठरले आहे. १९९२ साली अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील बाबरी मशीद पाडल्याने देशात विविध ठिकाणी दंगली उसळल्या होत्या, १९९३ च्या जानेवारीत मुंबईत भयावह अशी जातीय दंगल झाली, १२ मार्च रोजी भितीदायक असे बारा बाॅम्बस्फोट झाले, त्या प्रकरणात संजय दत्तला अटक झाली, दरम्यान ५ एप्रिलला दिव्या भारतीच्या मृत्यूने गूढ निर्माण झाले, हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन अशी वादळी चर्चा सुरू होती. ती फारच नकारात्मक होती.
फिल्म इंडस्ट्री डागाळली होती. दुसरीकडे पहावे तर देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे रुजत होते, १९९२ साली खाजगी वाहिनीचे आगमन झाले. मनोरंजन आणि वृत्त वाहिनी अशी दुतर्फा कलरफुल वाटचाल सुरु झाली. त्यामुळे आता सिनेमा पाह्यला थिएटरमध्ये कोण येणार?’ असा प्रश्न निर्माण झाला.
ऑगस्ट १९९४ साली अनेक मोठ्या शहरातील एकमेव थिएटरमध्ये राजश्री प्राॅडक्सन्सचा सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ अतिशय थाटात रिलीज होताच त्याला शहरी नवश्रीमंत उच्चभ्रू वर्गाने प्रतिसाद देणे म्हणजेच ‘आता हिंदी चित्रपट ही गोरगरीब जनतेची स्वप्नपूर्ती राहिलेली नाही’ अशा प्रवासाची सुरुवात होती. चित्रपटाचा अभ्यास करताना ही गोष्ट खूपच महत्वाची. डीडीएलजेने तीच बदलती वाट पुढे नेली. याबाबत हा चित्रपट माईलस्टोन.
यश चोप्रा यांनी आपल्या दिग्दर्शनात जे भावनिकपण जपले (वक्त, दाग, दीवार, मशाल, चांदनी, लम्हे यात ते अनेक दृश्यात आहे), रोमान्स खुलवला, गीत संगीत व नृत्याची बहार खुलवली, ते सगळे त्यांचा पुत्र आदित्य चोप्राने अतिशय आकर्षक पॅकमध्ये (काळ बदलला होता हो.) पहिल्याच दिग्दर्शनात ते खुलवून रंगवून पडदाभर साकारले. आणि ते नव्वदच्या दशकात सुसंगत होतेच.
डीडीएलजेचे बहुस्तरीय यश हा बहुपदरी विषय आहे. याच काळात अनेक शहरे महानगरे झाली, तालुका पातळीवर निमशहरीपण आले. शहरांचे वेगाने विस्तारीकरण होत होते. मुंबईत पन्नास पंचावन्न फ्लायओव्हर्स आले, मुंबई-पुणे एक्प्रेस वे बांधला.
जगण्याला वेग आला. सेकंड होम प्रतिष्ठेचे झाले. आऊटसोर्सिग वाढले. वीकएंड ट्रीप आणि हाॅटेलींग रुजले. शहरी युवक विदेशात शिक्षणासाठी तर दरवर्षी सहकुटुंब भटकंतीसाठी जाण्याचे प्रमाण वाढू लागले. या सगळ्या मानसिकतेला हा चित्रपट नकळत कनेक्ट होता.
जोडला गेला होता. डीडीएलजेतही विदेशातील इंग्लंडमधील भारतीय युवक-युवतीची प्रेम कथा आणि जोडीला वतन की याद, भारतीय असल्याचा अभिमान, देशप्रेम, दोन पिढ्यांतील कळत नकळतपणे संघर्ष असलेली मानसिकता आणि पंजाबी संस्कृती हीच गोष्ट आहे.
सगळे कसे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जुळून येत होते. अशातच पेजर आला आणि संपर्काचे नवीन साधन आल्याने आपण सुखावतोय तोच मोबाईल आला. मल्टीप्लेक्स युगाची सुरुवात झाली. बदल होतच असतो आणि होणारच असतो. तरी डीडीएलजेचा थिएटरमध्ये मुक्काम कायम होता.
एका दिवाळीत ‘दिल तो पागल है ‘ (१९९७), त्यानंतरच्या दिवाळीत ‘कुछ कुछ होता है ‘ ‘मोहब्बते ‘डाॅॅन २, वीर झरा, ओम शांती ओम ‘ वगैरे वगैरे असे प्रामुख्याने दिवाळीला शाहरूख खानचा सिनेमा असे समिकरण होत गेले. हे बरेचसे चित्रपट चकाचक, लॅव्हीश, नवश्रीमंत तसेच उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे असे. मल्टीप्लेक्स कल्चरचेच.
आता हिंदी चित्रपटाचा नायक टॅक्सी ड्रायव्हर अथवा हमाल असे कालबाह्य झालं. तो विदेशात वाढलेला पण भारतीय स्वाभिमान असणारा असा झाला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ने ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकनापर्यंत प्रगती झाली त्याबरोबर प्रदर्शित झालेल्या अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा ‘ने भव्य (आणि अतिरंजितही?) देशभक्ती चित्रपटाचा ट्रेण्डही आणला. कालांतराने दक्षिणकडचे चित्रपट हिंदीत डब होऊन येण्याच्या ट्रेण्डने ‘बाहुबली ‘(पहिला व दुसरा), केजीएफ, आरआरआर, पुष्पा, कांतारा अशा अतिभव्य फॅण्टसी मनोरंजन रुजवले. किती आणि कशी स्थित्यंतरे होत आहेत. या सगळ्याला डीडीएलजे एक प्रकारे साक्षीदार आहे.
डीडीएलजेच्या रिलीजच्या वेळी असलेली सिंगल स्क्रीन थिएटर्सची संख्या आज वेगाने खूप कमी कमी होत चाललीय. ते कालबाह्य झालेत. आज मल्टीप्लेक्स की ओटीटी असा प्रेक्षकांसाठी उत्तम पर्याय आहे.
एक हजाराव्या आठवड्यात शाहरूख खान आणि काजोल मराठा मंदिर चित्रपटगृहात आले होते. आपल्याच चित्रपटाच्या यशाचा असा प्रवास त्यांनी असा येऊन एकदा पहावा हे विशेष उल्लेखनीय आहे. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट आपले महत्त्व टिकवून आहे. खरं तर या चित्रपटाचे यश कशात?
राज मल्होत्रा (शाहरूख खान) आणि सिमरन सिंग (काजोल) यांच्यातील ही अगदी छोट्या छोट्या क्षणातून, प्रसंगातून खुलत, रंगत जाणारी अशी ही खेळकर, खोडकर, मार्मिक, मिश्कील अशी प्रेमकथा. त्यात विलक्षण अशी असोशी, जिव्हाळा आहे.
छायाचित्रण मनमोहन सिंग यांचे तर संकलन केशव नायडू यांचे आहे. चित्रपटात फरिदा जलाल, अनुपम खेर, सतीश शहा, मंदिरा बेदी, अचला सचदेव, पूजा रुपरेल, करण जोहर आणि अमरीश पुरी इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि चित्रपट एक टीमवर्क असल्याने या सगळ्यांचा या चित्रपटाच्या रंजकतेत सहभाग आहे.
डीडीएलजेला १९९५ चा सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ प्रदर्शित झाला तेव्हा तो असा बहुस्तरीय प्रवास करेल असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. तरी बरं चित्रपटसृष्टीत ज्योतिषी खूप आहेत.
चित्रपटाच्या जबरदस्त यशाने त्याची सगळीच समिकरणे बदलून टाकलीत, बदल ही तर केवढी तरी मोठी गोष्ट आणि तेच त्याचे वेगळेपण आहे आणि मोठेच यश आहे. सिनेमाच्या जगात तर यश म्हणजेच बरेच काही असते…
[blurb content=””]
glam.thakurdilip@gmail.com