आपण मागील लेखांमध्ये पाहिले की, संपूर्ण जगभरातील धर्मचिंतनामध्ये मानवी मनाविषयीचे चिंतन हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. किंबहुना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की, मानवी मनाविषयीचे चिंतन हा कायमच धर्मचिंतनाचा आत्मा अथवा गाभा राहिलेला आहे. धर्मचिंतनामध्ये मनाला ईश्वराचे रूप दाखवणारा आरसा मानले आहे. कधी ईश्वराशी जोडणारा दुवा म्हणजे मानवी मन असे समजले जाते. मनाशी सख्य साधून, तर कधी त्याच्यावर स्वार होऊन, स्वर्गाच्या दारावर पोहोचण्याच्या अथवा ईश्वर रूपात विलीन होण्याच्या अनेक मार्गांविषयी अनेक धर्म बोलले आहेत. मनाच्या अफाट शक्तीविषयी, क्षमतांविषयी तपश्चर्येतून प्राप्त होणाऱ्या रिद्धी-सिद्धीविषयी, आपल्याला धर्मचिंतनामध्ये ठाई-ठाई दाखले आढळतात. मनाच्या शक्तीचा असाच अत्युच्च आविष्कार म्हणजे भक्ती. श्री रामकृष्ण परमहंस गोष्टी सांगताना, तुम्ही त्यांच्या शिष्यांना म्हणाले होते की, एकदा प्रल्हादाने श्री विष्णूंना विचारले, देवा तुमच्या कानातील कुंडल हलत कसे नाहीत, खरेच देव आहात ना? ‘त्यावर विष्णू देवांनी मोठे मार्मिक उत्तर दिले आहे, ‘अरे मी तुझा देव आहे, तुझ्या इच्छेने माझ्या सर्व कृती होत असतात. तू कुंडल हलवलेस म्हणजे माझ्या कानातील कुंडल हलतील.’ धर्म हा कोणत्याही संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संस्कृतीचे ते अतिशय महत्त्वाचे अंग आहे. भारतीय संस्कृतीबाबत हे सत्य विशेषत्वाने खरे आहे. इथे धर्म हा शब्द वापरताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, आपण इथे कोणत्याही एका विशिष्ट पंथाविषयी बोलत नसून, मानवी समाजाला एकत्र आणणारा असा एक धागा अशा अर्थाने धर्माविषयी बोलत आहोत. ध्रृ धरायती इति धर्म ‘सर्वांना जोडून घेतो तो धर्म. एका बंधनात बांधतो तो धर्म. संपूर्ण लोक-मानसाला धारण करतो तो धर्म.’ स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘भारतीय मन हे मूलतः धार्मिक आहे. धर्म ही संकल्पना मध्यवर्ती ठेवल्याखेरीज भारतीय समाजाचा विकास होणे तसे कठीणच आहे’. असे त्यांना वाटत असे. म्हणूनच ‘शिवभावे जीव सेवा’ हे व्रत त्यांनी अंगीकारले तसेच दरिद्री नारायणाला आपल्या संपूर्ण धर्मधारणेच्या मध्यवर्ती ठेवले. लोकमानस ‘सामूहिक मन (कलेक्टिव्ह अनकॉन्शस) समाजमन’ या संकल्पनांभोवती अनेक प्रतीके जमून, त्यांचे पुढे धर्मधारणांमध्ये परिवर्तन झालेले दिसते. डॉक्टर रां.ची. ढेरे, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, अरुणा ढेरे इत्यादी अनेक तत्त्वचिंतकांनी संपूर्ण भारतीय लोकमानसाचा, धर्मधारणांचा फार सखोल अभ्यास केलेला आहे. पाश्चात्य परंपरेमध्ये कार्ल हूंग या मनोविश्लेषकाने लोकमानस समाजमन याविषयी फार विलक्षण अभ्यास केला आहे व सिद्धांत मांडले आहेत. विसाव्या शतकामध्ये कार्ल हूंग जे सिद्धांत मांडत होते, त्याचे दाखले भारतीय धर्मचिंतनात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. एकूणच काय तर मानवी संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, कलांमध्ये, तत्वज्ञानामध्ये या लोकमानसाला समाजमनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण आतापर्यंत व्यक्तीच्या मनाविषयी, त्याच्या क्षमतांविषयी, वेगवेगळ्या शक्तींविषयी आणि मानवी मनाच्या वैयक्तिक दुबळेपणाविषयी बोलत होतो. लोकमानस ही संकल्पना ही वैयक्तिक मनाच्या संकल्पनेच्या पलीकडे जाणारी अशी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, हे लोकमानस अनेक प्रतीकांनी, तत्त्वांनी जोडलेले असते. अनेक लोककथांमधून, लोककलांमधून, काही विशिष्ट प्रतिमांद्वारे हे लोकमानस आपल्याला अवचित अनुभवत राहते आणि त्यातून आपण एकमेकांशी जोडले जातो. एकसंध असा संस्कृतीचा पदर त्यातून विणला जातो. एखाद्या उदाहरणामधून आपण ही संकल्पना समजून घेऊ या.
मानवी मनाला अतिशय जवळचा वाटणारा एक निसर्ग ठेवा म्हणजे चंद्र. अनेक मानवी सभ्यतांमध्ये, संस्कृतीमध्ये, लोककलांमध्ये, लोककथांमध्ये, वाङ्मयामध्ये आपल्याला चंद्र हे प्रतीक पुन्हा-पुन्हा प्रतित होते. मानवी मनशक्तीचे, मानवी मनामधील कोमल भावनांचे, निर्मल उज्वल धारणांचे प्रतीक म्हणजे चंद्र. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मन:शक्तीचा कारक मानला आहे. तसेच अध्यात्म शास्त्रामध्ये पूर्ण कैवल्य आनंदाचे प्रतीक म्हणजे चंद्र.
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….!
– कवी. श्री. अशोकजी परांजपे
सर्व विश्वाची माऊली असलेले ज्ञानदेव ईश्वरनिष्ठांचे वर्णन करताना आवर्जून म्हणतात,
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्व ही सदा सज्जन । सोयरे होतू ।।
(पसायदान) तसेच, प्रेमिकांचा साक्षीदार हाही चंद्रच. समुद्रमंथनमधून बाहेर आला म्हणून पृथ्वीचा, धरित्रीचा भाऊ म्हणजे चंद्र. त्यामुळेच धरित्रीच्या सर्व लेकरांचा तो लाडका चांदोमामा होतो. ब्रिटिश संस्कृतीमध्ये, इंग्लिश भाषेत मूनस्ट्रक असा वाक्यप्रचार येतो. पूर्ण चंद्रबिंब बघून भाव विभोर वेडा होतो तो मूनस्ट्रक. हे एक प्रतीक झाले, अशी असंख्य प्रतिके आपल्या अवतीभवती असतात, ज्यांच्यामुळे समाजमनामध्ये अर्थ निर्मिती होत असते. ही प्रतीके लोकमानसात वसत असतात. आपल्या लोकसंस्कृतीला पुढे नेत असतात, ‘भारतीय संस्कृती’ नावाच्या एका छोटेखानी पुस्तकात आदरणीय साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीचा पर्यायाने भारतीय लोकमानसाचा गाभाच उलगडून दाखवला आहे. भारतीय संस्कृती ज्यामुळे साकारली, वृद्धिंगत झाली अशा तत्त्वांविषयी, मनाच्या वैशिष्ट्यांविषयी, साने गुरुजींनी अतिशय सरल व सोपे भाष्य केले आहे. गुरुजींच्या मते, ‘भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता’, ‘भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग’, भारतीय संस्कृती म्हणजे ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते’ असे मानणारे मन सर्वसमावेशक, सर्वांना जवळ घेते ती भारतीय संस्कृती.
सहनाववतु । सह नी भुनक्तु । सहवीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।।
– शांतिमंत्र
भारतामध्ये निर्वासितांची (refugees) समस्या सहसा आढळून येत नाही. याचे कारण म्हणजे, भारतीय मन सतत सगळ्यांना सामावून घेत असते विशालतेकडे, उदारतेकडे असा भारतीय मनाचा प्रवास असतो. याच विशालतेचे, उदात्तेचे अजून एक अति प्राचीन, कदाचित सनातन प्रतीक म्हणजे महाराष्ट्रातली पंढरीची. जिथे सर्व भेद बाजूला ठेवून लोकमानस एकसंघ होऊन विठू नामात, विठूच्या अस्तित्वात विलीन होते ती म्हणजे वारी. याशिवाय उन्नत लोकमानसाचे दुसरे प्रमाण ते काय, बरे असू शकते? जेथे तेथे देखील तुझीच पावले । सर्वत्र संचले तुझे रूप. मन असे भेदाभेदांच्या पलीकडे नेता येणे, विशाल उदार, उदात्त, उन्नत करता येणे, हे महत्त्वाचे कौशल्य आपल्याला पंढरीची वारी शिकवते.
naiksuchitra27@gmail.com