बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं तेजोमयीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फार प्रभावित झाली. “या” ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही याची शंका सध्या तेजोमयीस सारखी येऊ लागली होती. ही शंका तिने अलेक्झांडरकडे व्यक्तही केली. मी काय करणार बापुडा, असे केविलवाणे भाव त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उमटले.
तेजोमयी आठवित शिकते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घरी, तिने हे व्हायला हवं नि ते व्हायला हवं, अशी चर्चा तिचे आईबाबा आणि घरी येणाऱ्या त्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये होऊ लागली.
तेजोमयी खूपच हुषार असल्याची तिच्या बाबांची समजूत. त्यामुळे तिच्या हुषारीला केवळ वैद्यकीय क्षेत्रातच खरा न्याय मिळू शकेल, असं काहीसं तिचे बाबा, आईला एकदा बोलून गेलं. ते ऐकल्यावर आधी आईने “आँ” केला. याचा अर्थ तिला बाबांचं सांगणं कळल नसावं असा होता. म्हणजे, तिने डॉक्टर व्हायला हवं, असं तुम्हाला म्हणायच का? आईने विचारलं.
हो हो हो, अगदी बरोबर, तेजोमयी इतकी हुषार आहे की तिला मेडिकलला सहजच प्रवेश मिळेल. बाबा स्वत:वरच खुष होऊन म्हणाले. सहामाही आणि वार्षिक परीक्षेत चांगले गुण मिळतात म्हणून तेजोमयीस ते खूप हुषार समजायचे.
तिच्या कानावर ही चर्चा हळूहळू येऊ लागली. आत्तापासून यांना मला डॉक्टर करण्याची का बरं घाई झालीय? असं तिला वाटू लागलं. डॉक्टरचं नाव कानावर पडलं तरी तिच्या पोटात कससच व्हायचय. तिला खरा रस होता चित्र काढण्यात. त्यात ती खूप रमायची. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिला बक्षिसही मिळत. शाळेत याचं खूप कौतुक व्हायचं. घरी, आई कधीतरी कौतुकाचे दोन बोल बोलायची. मात्र बाबा, हं ! अच्छा…बरं बरं…एव्हढी प्रतिक्रिया देत.
चित्रात रमणारी तेजोमयी त्यांना अजिबात आवडत नसे. उन्हाळ्याच्या सुटित तिने चित्रकलेचा क्लास लावण्याचा हट्ट धरला, तेव्हा त्यांनी त्यास नकार तर दिलाच आणि मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, नीट परीक्षेचा क्लास लावून दिला.
कसं बरं समजवायचं बाबांना? तेजोमयी विचार करु लागली. देवाने तिची प्रार्थना ऐकली असावी. कारण तिच्या कानावर “ताईची” गोष्ट पडली.
ही ताई म्हणजे कार्तिकी. तिचं आडनाव गोन्साल्विस. ते महत्वाचं नाही.
महत्वाचं हे की, परवा ऑस्कर चित्रपट सोहळ्यात कार्तिकीताईने दिग्दर्शित केलेल्या हत्तीवरील एका डॉक्युमेंट्रीस ऑस्कर मिळालं. बाबा, तेजोमयी,आई आणि अलेक्झांडर, हा सोहळा बघत होते. कार्तिकीताईला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जणूकाही त्यांनाच पुरस्कार मिळाल्याचं समजून बाबांनी जोरजारात टाळ्या वाजवल्या. तेजोमयीकडे बघून ते म्हणाले, बघ बघ, असं यश मिळवायचं असतं.
म्हणजे हो काय बाबा? असं तेजोमयीला विचारावं वाटलं. पण ती गप्प बसली. ही कार्तिकीताईच आपल्या मदतीला येऊ शकते असं तिला त्याक्षणी वाटलं.
सोहळा संपल्यावर सगळेजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तेजोमयीने गुगल महाराजांना कार्तिकीताईबद्दल प्रश्नांवर प्रश्न विचारले. गुगल महाराजांनी दिलेली उत्तरं बघून ही ताईच आपल्या मदतीस येऊ शकते याची तिला खात्रीच पटली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा पेपर वाचत असताना, ती त्यांच्याकडे गेली आणि ती बाबांना सांगू लागली, कार्तिकीताईचे बाबा आयआयटी मद्रास येथे कॉम्प्युटर सायन्स विषयाचे प्राध्यापक आहेत.
अरे वा!
तिच्या आईने, पूर्व युरोपीय देशांचा अभ्यास करुन पीएचडी मिळवलीय.
वा मस्त, छान! अशी प्रतिक्रिया देऊन बाबांनी पेपरमध्ये डोकं खुपसलं.
लगेच त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? पेपर बाजूला ठेवत कल्याणीला विचारल….
अगं पण, तू मला हे कां बरं सांगतेस?
अहो बाबा, कार्तिकीताईचे आईबाबा इतके हुशार म्हणजे तीसुध्दा खूप हुशार असणारच ना!
हं… असायला पाहिजे…बाबा म्हणाले.
पाहिजे नाही बाबा असणारच…
बरं मग? ही ताई इतकी हुशार असूनही फोटोग्राफी आणि फिल्ममेकिंग शिकली.
अगं, पण तू हे मला कां सांगतेस? बाबांनी पुन्हा विचारलं.
अहो बाबा, तिच्या आवडीचं शिकली म्हणूनच हत्तीवरची डाक्युमेंट्री ती करु शकली ना…
अगदी बरोबर…
म्हणूनच, तुम्ही म्हणता तसं तिला जबरदस्त यश मिळालं ना…
अगदी बरोबर…
समजा तिची हुषारी बघून तिच्या आईबाबांनी तिला आयआयटीत टाकलं असतं तर ती, फार तर कॉम्प्युटर इंजिनीअर बनली असती…
अगदी बरोबर… बाबा बोलून गेले.
अगं तू, वाट्टेल ते काय मला सांगत बसलीस? ते लगेच स्वत:ला सावरत म्हणाले. तेजोमयीचा आटापिटा कशासाठी चाललाय हे बहुदा लक्षात आलं असावं.
तिच्या डोळ्यात बघून ते काहीशा कठोर आवाजात म्हणाले, हे बघ तेजो, कार्तिकीने काय केलं किंवा नाही केलं, हे मला सांगू नकोस. तुला डॉक्टरच व्हायचय हे लक्षात ठेव. दोघांचा संवाद तिथेच थांबला.
आजचा पेपर कल्याणीने हातात घेतला. पेपरमध्ये आलेली कार्तिकीताई आणि तिच्या हत्तीची बातमी तिने मन लावून वाचली. कानाजवळ येऊन गुजगोष्टी करणाऱ्या हत्तीवर कार्तिकीताईने डाक्युमेंट्री बनवली होती. हा हत्ती बाबांच्या स्वप्नात यावा नि त्याने बाबांना आपल्या स्वप्नाविषयी समजावून सांगावं, असं तिला वाटलं. काय रे, बरोबर ना… तिथेच रेंगाळत असणाऱ्या अलेक्झांडरकडे बघून ती म्हणाली. त्यानेही होकारार्थी आशयाची मान आणि शेपूट हलवली. तुझ्या तोंडात साखर, म्हणून तिने अलेक्झांडरचा कान हलकेच लाडाने उपटला.
– सुरेश वांदिले
ekank@hotmail.com