जून २०२२ मधील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर स्थापन झालेले भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांचे युती सरकार आज एका अस्वस्थतेत उभे आहे. आधीच्या वर्षभरातही एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी ४० अधिक दहा असे ५० आमदार हे तणावात होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे नाव घेऊन बाहेर पडलेल्या या आमदारांना मातोश्रीतील हालचाली व तिथून सुटणारे शब्दबाण हे हैराण करत होते. न्यायालयीन लढाई सुरुच होती आणि त्यातील अपात्रतेच्या प्रकरणांचाही मोठा तणाव होता.
एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले अशा महत्वाच्या शिंदे सेनेच्या १६ आमदारांच्या विरोधातच उद्धव ठाकरे सेनेने अपात्रतेची मागणी केली होती. घटनेच्या दहाव्या अनुच्छेदाचा अभ्यास असणारे कायदेतज्ज्ञ सांगत होते व आजही सांगतात की या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याशिवाय विधानसभा अध्यक्षांपुढे पर्याय दिसत नाही. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट बाहेर पडला आहे आणि तोही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला वर्ष पूर्ण होण्याच्या टप्प्यावर.
अजितदादा पवार हे सत्तेत सहभागी झाले व त्यांच्याही आठ सहकाऱ्यांना मंत्रीपदे मिळाली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ असे जुने जाणते लोक मंत्रीपदी आल्यानंतर आधीची राज्य मंत्रीमंडळातील मांडणी बिघडली. आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मंत्रीमंडळाच्या यादीत तिसरा क्रमांक लागत होता तो राधाकृष्ण विखे पाटील यांचा. आता ते थेट सहाव्या-सातव्या स्थानवर गेले आहेत !
वरिष्ठ नेते मंत्रीपदी आल्यनंतर सहाजिकच खात्यांचे फेरवाटपही झाले. त्यात भाजपचे गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे अशा नेत्यांकडील मोठी खाती गेली आणि त्यांच्याकडे खात्यांच्या यादीत थोडी खाली गणली जाणारी खाती आली. शिवाय शिंदे गटातील जे आमदार मंत्रीपदाची स्वप्ने पाहात होते तेही थोडे बिथरले. पुढचा विस्तार लगेच होणार असे शिंदे- फडणवीस सांगत होते. पण आता दीड- दोन महिने होत आले तरी तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे नाव कोणीच काढत नाहीत.
भरतशेट गोगावलेंनी तर परवा सांगितलेला किस्सा हा शिंदे गटात किती अस्वस्थता आणि मंत्रीपदावरून चिडचिड सुरु आहे हे दाखवणारा आहे. अलिबागला जाहीर कार्यक्रमात बोलताना सरकारी पक्षाचे प्रतोद गोगावले म्हणाले की, माझे नाव सुरुवातीच्या शिवेसनेच्या नऊ मंत्र्यांच्या यादीतच होते. पण यादीत नाव नसलेले एक आमदार शिंदेकडे आले व म्हणाले की मला मंत्री नाही केलेत तर राणे कंपनी मला कोकणात जगणे मुष्कील करेल. दुसरे एक आमदार आले आणि म्हणाले की, साहेब मला मंत्री नाही केलेत तर माझी पत्नी आत्महत्या करेल. मी म्हटले की बाबा याची पत्नी जगू दे. मला नाही मंत्री केलेत तरी हरकत नाही.
गोगावलेंचे हे म्हणणे खरेच असणार. कारण त्यांनी रायगडचे आपले दुसरे शिंदे समर्थक आमदार महेन्द्र थोरवे यांना बजावले की ही हकीकत तुम्हीही रायगडच्या जनतेला जोरात सांगा. म्हणजे लोकांना कळेल की गोगावले का नाही मंत्री बनले. थोरवेंनी त्याच कार्यक्रमात आणखी एक पुडी सोडून दिली की पुढच्या काही तासातच गोगावले शेट मंत्री बनलेले आपल्याला दिसतील. त्या तासांचे दिवस झाले तरी गोगावलेंसाठी काही लालदिवा चमकला नाही.
ही अस्वस्थता कमी होती म्हणूनच काय अजितदादा पवारांच्या शपथविधीनंतर त्यांचे व काका शरद पवार यांचे संबंध नेमके काय आहेत, शरद पवारांच्या पुढच्या हालचाली कशा असतील, या प्रश्नाने राजकीय क्षेत्रात अस्वस्थता तयार झाली आहे. गेल्या दीड महिन्यांच्या काळात शरद पवारांनी अजितदादांच्या चार वेळा भेटी घेतल्या तर त्यांच्या मंत्र्यांनाही ते अनेकदा भेटले. दादा गटाच्या आमदारांनाही थोरले पवार भेटत होते. परवाची त्यांची भेट तर जरा गूढ वाटणारी ठरली व त्यामुळे महाविकास आघाडीतील. उर्वरीत ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यातही प्रचंड अस्वस्थता तयार झाली.
शरद पवार आणि अजित पवारांच्या या भेटींमुळे शरद पवारांच्या भावी राजकीय भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह तयार होते आहे. पवार काका-पुतण्यांच्या भेटींचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ लावत आहेत. कुणी या भेटींकडे ‘पवार स्टाईल’ म्हणून पाहतात, तर काका- पुतण्याची ती ‘कौटुंबिक भेट’ होती असेही मानतात. या भेटींनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना एक निराळी भूमिका बोलून दाखवतात. पण एका पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केलेले विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे आहे. शरद पवार म्हणाले की, ‘काही हितचिंतकांकडून आमचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय.’ अजित पवार यांनी पुण्यात चोरडियांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत कोल्हापूरात बोलताना म्हटले की, ‘इथून पुढे मी आणि शरद पवारसाहेब एकमेकांना भेटलो, तर त्या भेटींना ‘कौटुंबिक भेट’ समजावे.’
‘पण तुम्ही लपून छपून ही भेट का घेतली ?’ असा प्रश्न केला गेला तेव्हा अजितदादा खवळले. ते म्हणाले, ‘मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता असून मी अशी कुठेही लपून भेट घेतली नाही.’ दादा असेही म्हणाले की ‘चोरडिया कुटुंबाचे आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. चोरडिया यांचे वडील पवार साहेबांचे वर्गमित्र होते. आम्हा दोघांना त्यांचं घर हे भेटण्यासाठी सोयीचं होतं म्हणून आम्ही तिथे भेटलो.’ मात्र, कौटुंबिक भेटीचं कारण पुढे करत अजित पवार त्यांची अस्वस्थता लपवत आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. एकीकडे शरद पवार त्यांच्या भाजपविरोधी भूमिकेवर ठाम असताना, अजित पवारांची अस्वस्थता वाढत चालली आहे. शरद पवारांनी राज्यभर दौऱ्यांची घोषणा केलीच आहे. छगन भुजबळांच्या मतदारसंघात त्यांनी घेतलेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता पवारसाहेब बीडला म्हणजेच अजितदादांचे दुसरे महत्वाचे ओबीसी साथी धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात गेले आहेत. ही बाब राजकीय दृष्ट्या लक्षणीय आहे.
पण हेही खरेच आहे की भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला ढवळून काढण्याची कार्यक्षमता शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आजही आहे. त्यामुळेच एकाच वेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि नाना पटोले, अशोक चव्हाणांसारखे नेते पवार काका-पुतण्याचे चाललेय तरी काय या आशंकेने तळमळत असतानाच तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेही बीपी वाढते आहे. त्यातही जर पवार स्वतःच भाजपप्रणित रालोआमध्ये आले तर त्याचा भला परिणाम शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर होईल की, ती घटना शिंदेंसाठी मोठ्या संकटाची चाहूल ठरेल; या प्रश्नाचे उत्तर सध्या मुख्यमंत्र्यांचे समर्थक अस्वस्थतेत आहेत.
– अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com