सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ।।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ।।
सगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगातील या चार ओळी, खूपदा मुखी येतात. श्री विठ्ठलाचे वर्णन अनेक संत-महंतांनी अनेक ओव्या अभंगांमधून केलेले आहे. श्री विठ्ठल आणि रखुमाई ही आपल्या हिंदू धर्माच्या श्वासांमध्ये आहेत. श्री विठ्ठलाच्या नामनामाने, नामघोषाने आणि नाम संकीर्तनाने आजही अनेक खेडी जागी होत असतात.
ही परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. श्रीविठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन पंढरपूरला पायी चालत जाऊन-वारी करून घेणे ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाची आस आहे. पंढरीच्या वारीचा इतिहास तसा किमान ९०० वर्षाहून जुना आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी पंढरीची वारी केल्याची नोंद वाचायला मिळाली आहे. परकीय आक्रमकांच्या कालखंडातदेखील वारीची परंपरा जपली गेली, हे येथे नोंदवणे आवश्यक ठरते.
एकूणच, महाराष्ट्रीय इतिहासाच्या पानोपानी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आणि वारीची नोंद आहे. ही नोंद केवळ इथल्या संत-महंत तथा वारकरी आणि साहित्यिकांनी फक्त केलेली नाही; तर ब्रिटिश तसेच पोर्तुगीज इतिहासकारांनी या बाबतच्या नोंदी घेतलेल्या आढळतात. डब्ल्यू आय क्रूक, हॅरी बक, सर मॉनिअर इत्यादी परदेशी इतिहासकारांनी घेतलेल्या नोंदी अभ्यासपूर्ण आहेत.
पंढरीची वारी म्हटले की “आषाढी आणि कार्तिकी भक्तजन येती” या ओळी सहज ओठी येतात. आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात तर कार्तिकी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरातून आपापल्या गावी जातात. मात्र, या शिवायही चैत्र आणि माघ महिन्यांत वारी होत असते. या सर्वच वाऱ्यांचे श्री विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन हे मुख्य कारण असतेच, पण सर्व भेदाभेद नष्ट करून-नाकारून ईश्वराच्या ठायीं लीनपणे जाणे हे वारीचे महत्वाचे वैशिष्ट्य असते.
वारकरी संप्रदाय तथा माळकरी संप्रदाय हा भागवत धर्म तर आहेच; परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील चुकीच्या बाबींना भक्तीच्या, प्रार्थनेच्या आणि श्रद्धेच्या बळावर छेद देऊन एकता राखणारा, समता जपणारा हा इतिहासाच्या साऱ्या पटलावर चिरकाल टिकलेला वृध्दिंगत होत गेलेला धर्म आहे. आषाढी वारी ही सारी सृष्टी पर्जन्यधारांनी न्हाऊन निघत असताना होत असते, तर कार्तिकी वारी सारी सृष्टी प्रसन्न शितलतेचा स्वीकार करत असताना होत असते. आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे महाराष्ट्रासाठी भक्तीचे, श्रद्धेचे आणि म्हणूनच सणाचे दिवस आहेत.
श्री विठुरायाचे दर्शन ही प्रत्येक मराठी माणसाला व ज्या ज्या व्यक्तीला विठुराय माहीत आहेत. त्यांची ओढ लागते आहे त्या प्रत्येक मानवी मनाला एक पर्वणी वाटते. इतिहासाच्या पानांना पलटवत पलटवत गेले तर हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आपणांस ११ व्या शतकाच्या उंबरठ्यावर घेऊन जाते. यादव काळात म्हणजेच १२ व्या शतकात हे श्री विठ्ठल मंदिर बांधल्याचे स्पष्ट होते.
श्री विठ्ठल या लोकदेवाला श्रीकृष्णाचे रूप म्हणून पूजले जाते. या लोकदेवाच्या आख्यायिका आणि हजारो कथा या मानवी समूहास चित्त शुद्धतेने घट्ट धरून ठेवण्याचे कार्य करत आहेत. पंढरपूर या क्षेत्राचे स्थान पाहता महाराष्ट्र आणि कर्नाटक या आजच्या दोन्हीही राज्यांना ते सोयीचे ठरते आहे. या दोन्ही राज्यांत विठुरायाची भक्ती ही अनन्यसाधारण बाब आहे.
श्री विठुरायाच्या या मंदिराच्या प्रवेशाशी असलेली संत चोखामेळा यांची समाधी आणि मंदिराच्या पहिल्या पायरीवरील संत नामदेवांची समाधी या दोन्हीही समाध्या भारतीय श्रद्धेच्या परंपरेचा गाभा आहेत. या समाध्या मानवी भक्तीची अत्युच्च मिती आहेत आणि या दोन्हीही समाध्या समाजजीवनाला उच्चतम मूल्यांची आराधना करावयास लावण्यासाठी शेकडो वर्षे प्रेरक ठरत आहेत.
श्री विठ्ठल रखुमाई यांच्या नामघोषाने अनेकानेक भेद संपून सारे वातावरण भक्तिमय होते आणि प्रत्येक वारीमध्ये हीच बाब मौल्यवान असते. वारी म्हणजे फक्त चालणे नाही ती समूह जीवनाची गंगोत्री आहे. समूह जीवनाच्या मुळाशी आणि “भेदाभेद अमंगळ आम्हां” या वचनाच्या ठायी जाण्याशी वारी ही सूत्रबद्ध रूपाने कार्यरत आहे. म्हणूनच ती अनेक संतांच्या ओव्या अभंगांतून शेकडो वर्षे मुखोमुखी आणि स्मरणमण्यांनी पाझरत राहिली आहे.
या ओवी-अभंगांमध्ये मानवी दुःखे आणि समाज जीवनाची चित्रे रेखाटली गेली आहेत. लोकगीतांमध्ये श्री विठ्ठल-रखुमाई म्हणूनच अढळ स्थान मिळवून आहेत. जात्यावरच्या अनेक ओव्यांमध्ये विठ्ठल रूक्मिणीचे लग्न, संत जनाबाई, विठुराया रखुमाईला आपल्या व्यथांची वेदनांची गाऱ्हाणी सांगणे, इत्यादी अनेक उल्लेख आढळतात.
संतांचे अनेक अभंग आज आपण संगीतबद्ध केलेले ऐकत असतो, पण शेकडो वर्षे हे अभंग पाठांतराच्या जोरावर काळाच्या प्रवाहात पुढे पुढे सरकत आलेले आहेत. वारकरी संप्रदायाने मौखिक पाठांतराने जे जतन केले आणि त्यामागे कोणताही प्रचारकी अभिनिवेश न आणता जे जपले. त्यामुळे शिक्षणासंदर्भातील जी अहितकारी -गैर अशी जी सामाजिक व्यवस्था होती ती नष्ट होण्यास मदतच झाली, हे मान्य करावे लागते. त्यामुळेच इतरही अत्यंत अन्याय्य सामाजिक व्यवस्था तोडण्यासाठी श्रद्धेच्या आणि भक्तीच्या मार्गाने रस्ता मिळत गेला हे समजून येते. श्री विठ्ठलाच्या नामघोषाने हे समूहाने एकत्र येणे म्हणूनच अधिक कालोपयोगी वाटत राहते आणि माणूस म्हणून कालौघात आपली विचारकेंद्रे भक्तिमय मार्गाने प्रज्ञाप्रणित झाली हे आकळून येते.
आषाढी तथा कार्तिकी वारी यांचेकडे या नजरेतून पाहिल्यानंतर श्रद्धेच्या भावनेला बळ तर येतेच पण त्या जगचालक विठुरायाची अनंत शब्दांनी पूजा बांधणाऱ्या आणि मानवतेचा वसा घेऊन जीवन जगा असे सांगणाऱ्या संत धुरीणांना अपेक्षित असलेल्या मूल्यांची सहजपणे जपणूक करण्याची इच्छाकांक्षा मनात मूळ धरू लागते.
आषाढी एकादशी म्हणा किंवा कार्तिकी एकादशी म्हणा, आसपास एक वेगळे चैतन्य निर्माण करतात. “राम कृष्ण हरी”च्या जपाने आणि आरोळीने मन आनंदी होते. मनातील व्यथेची तीव्रता आणि हळुवारपणेही जाणवणाऱ्या आपल्याच चुकांची क्षमता आपल्याला कळू येते व ती मनातील व्यथांची तीव्रता कमी होण्यासाठी आणि चुकांची क्षमता दुर्बल होण्यासाठी त्या विठुरायाला शरण जाणे आवश्यक वाटू लागते. त्या विठुरायाशी लीन होणे म्हणजे जीवनाचा गाभारा त्या भक्तीच्या आनंदाने भरून घेणे आहे हे कळू लागते, उमगू लागते.
या उमगण्याच्या सहजसुंदर अवस्थेत आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार अशा शेकडो संतांची मांदियाळी कळून येते. भक्तीच्या अविरत, अथांग आणि अखंड प्रवाहात आपल्याला जीवनाचा अर्थ कळावा असे वाटू लागते. अनेकानेक संतांचे शब्द आपल्या मनात फेर धरतात. कधी तरी त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे शब्द येतात
आवडेल तैसे तुज आळवीन ।
वाटे समाधान जीवा तैसे ।।
…. आजच्या समाज व्यवस्थेत सारी निराशा पसरली आहे असे वाटत असताना भक्तीच्या पायरीवर बसून ईश्वराला आळवण्याचे भान येणे हीच या देहाच्या वारीची चार पावले आहेत, असे मनी येत राहते आणि मनचक्षूंसमोर श्री विठ्ठलाची ती सावळी मूर्ती उभी राहते हात नकळतपणे जोडले जातात… श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल… ओठ हलतात !!
अनुपम बेहेरे
sphatik69@gmail.com