दबावतंत्राने 'दिव्यांग बोर्ड' संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल
दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबवली जाते. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. मात्र, काही सामाजिक संघटनांच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय पथकाने काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती दिली होती आणि प्रसारमाध्यमांद्वारे संपाचा इशाराही दिला होता. त्यानुसार बुधवारी कामकाज ठप्प राहिल्याने रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दिव्यांगांचे हाल होऊ नयेत यासाठी पुढील बुधवारी तपासणी केली जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांना निराश होऊन परत जावे लागले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, दिव्यांग बोर्डाच्या कामकाजाबाबत समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांतून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या बदनामीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून, त्याच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
दिव्यांग बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, आमच्याविषयी सातत्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी दबाव आणला जातो. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आतापर्यंत संयम ठेवला; मात्र ठोस उपाययोजना न झाल्यास तपासणी सुरू केली जाणार नाही.
Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दिव्यांग विभाग प्रमुख जालिंदर लहामगे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 100 ते 150 किलोमीटरवरून आलेल्या दिव्यांगांची मोठी हेळसांड झाल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये हस्तक्षेप अयोग्य असला तरी संपामुळे दिव्यांगांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, काही दिव्यांग संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांना समर्थन जाहीर केले आहे.






