मागील लेखामध्ये आपण योगदर्शनामधील ‘चित्त’ ही संकल्पना पाहिली. पाश्चात्य विचारधारेतील मन या संकल्पनेपेक्षा विशाल अशी ही चित्त संकल्पना आहे. एकूणच पौर्वात्य संस्कृतीमध्ये आणि विचारधारांमध्ये मनाची अशी अनेक प्रारूपे आपल्याला दिसतात. योगदर्शनाने उभे केलेले मनाविषयीचे हे प्रारूप अतिशय चिंतनीय तसेच प्रॅक्टिकली खूप महत्त्वाचे आहे. परंतु या शिवाय ही आपल्याला वेगवेगळ्या पौर्वात्य विचारधारांमध्ये याहूनही भिन्न प्रारूपे पाहायला मिळतात. उदाहरणांवरून आपण हे पाहू.
स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर आधारित त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये मानवी अस्तित्वाची तुलना कोषांशी केली आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते मानवी अस्तित्व हे कमळाप्रमाणे अनेक पाकळ्यांचे अथवा कोषांचे बनले आहे. पंचकोष संकल्पनेद्वारे स्वामीजींनी मानवीअस्तित्व अथवा मानवी अस्तित्वाचे पापुद्रे आपल्याला समजावले आहेत. अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष आणि आनंदमयकोष. पाच पापुद्रे मानवी अस्तित्वात अधिष्ठित असतात. सगळ्यात वरचा कोश म्हणजे अन्नमयकोष ज्यात आपले स्थूल शरीर सामावलेले आहे. प्राणमयकोष ज्याच्यात प्राणवायूशी सुरुवात होऊन आपल्या अनेक शारीरिक क्रिया सामावलेल्या आहेत. त्यानंतर येणारा मनोमयकोश. ज्याची तुलना आपण पाश्चात्य ‘मन’ या संकल्पनेची करू शकतो. त्यानंतर विज्ञानमयकोष जिथे बुद्धीचे व ज्ञानाचे अधिष्ठान असते. आणि त्यानंतर सर्वात आत अतिशय सखोल वसलेला आनंदमयकोष जो सतत आनंद स्वरूप असतो.
अन्नमय कोषापासून सुरुवात करून हळूहळू या अंतरात्म्यापर्यंत पोहोचणे यातच जीवाची इति कर्तव्यता अथवा मानवी जीवनाची फलश्रुती सामावलेली आहे असे वैदिक परंपरा अर्थात स्वामी विवेकानंद आणि इतर अनेक पौर्वात्य विचारवंत मानतात. हे सगळं समजण्यासाठी आपल्याला मनाचा उपयोग करून घ्यावा लागतो, त्याला शिस्त लावावी लागते, कधी त्याला बोलून व चुचकारून तर कधी फटकारून जप, तप, स्वाध्याय अशा अनेक मार्गाने मनाला नियंत्रणात आणून अंतरात्म्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग ही पौर्वात्य परंपरा सुचवते. अर्थात इथे नमूद करावयाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्वात्य परंपरेमध्ये अधोरेखित केलेले मोक्षाचे महत्व. मनाचा उपयोग मोक्षाप्रति जाण्यासाठीच केला पाहिजे असा एक विचार. असाच विचार आपल्याला इतरही दर्शनांमध्ये इतर संस्कृतीमध्ये सुद्धा केलेला आढळतो. यातील एक ठळक उदाहरण म्हणजे झेन तत्वज्ञान. अनेक रेचक बोधकथांद्वारे, कोड्यांद्वारे झेन तत्वज्ञान आपल्याला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करते. आपल्या बाह्य अहंकारापेक्षा आपला आत्मिक विकास कशात आहे, याचा विचार करायला भाग पाडते आणि अर्थातच यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आयुध असतं ते आपलं मन.
झेन तत्वज्ञानातली एक लोककथा पुढीलप्रमाणे…
एकदा एक सामुराई एका फार मोठ्या गुरूकडे जातो. सामुराई तरुण असल्याने त्याच्या मनात खूप कुतूहल असते. तो गुरुजींना पहिलाच प्रश्न करतो, गुरुजी या विश्वामध्ये स्वर्ग आणि नरक असतात का? यावर ते गुरुजी काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण काही क्षणांनी ते या सामुराईची निंदा करायला सुरुवात करतात. सामुराईचा राग हळूहळू वाढायला लागतो आणि ते जेव्हा जपानबद्दल वाईट साईट बोलतात. तेव्हा मात्र सामुराईचा हात कमरेला असलेल्या तलवारीकडे जातो आणि तो तलवार उगारतो. अगदी त्याचक्षणी झेन गुरुजी मिस्कीलपणे हसतात आणि म्हणतात हेच नरकाचे द्वार आहे. सामुराईला आपली चूक कळते. गुरुजींनी घेतलेली फिरकी त्याच्या क्षणात लक्षात येते आणि मग तोही निर्मळपणे हसतो. त्या क्षणी गुरुजी म्हणतात तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य आणि तुझ्या मनातला निर्मळपणा हे आहे स्वर्गाचे दार. थोडक्यात काय तर अतिशय साधेपणाने अनुभवाद्वारे झेन गुरुजी फार मोठा धडा आपल्या शिष्याला देतात. एक फार महत्वाचं भाष्य मानवी मनाविषयी करून जातात.
आपल्या मनातील राग, लोभ, मद, मोह, मत्सर इत्यादी शत्रू आपल्याला नरकात घेऊन जातात तर आनंद, विनोद, सकारात्मकता हे आपल्याला स्वर्गाच्या दारात आणून सोडतात. म्हणजेच काय तर शेवटी आपल्या अस्तित्वाचा कस हा आपल्या मनाच्या गुणवत्तेवर ठरतो. झेन परंपरासुद्धा प्राचीन भारतीय परंपरेप्रमाणे मानवी मनाची अशी कौशल्य विकसित करण्यावर भर देते. मन सकारात्मक ठेवण्यासाठी कोडी, हायकू, कविता, लाफिंग बुद्धाचे मॉडेल अशी अनेक छोटी छोटी तंत्रे झेन बुद्धिझमने सांगितली आहेत. कसंही करून सकारात्मकतेने संपूर्ण जीवनव्यवहाराकडे पाहणं हे महत्वाचे. भगवद्गीता स्थितप्रज्ञेबद्दल बोलते. झेन दर्शन थोड्याफार फरकाने तेच प्रारुप मांडते आणि दोन्हीही दर्शने मनाच्या शक्ती मनाची कौशल्ये विकसित करण्यावर भर देतात.
मानवी संस्कृतीकडे सहज एक नजर टाकली तरी आपल्या असं लक्षात येतं की मानवी मनाच्या क्षमतांचा एकेक अविष्कार म्हणजे मानवी संस्कृतीचा एकेक आयाम आहे. उदाहरणार्थ मानवी बुद्धीचा जसजसा विकास होत गेला तसतसे विज्ञान अस्तित्वात आले. विज्ञानाला जेव्हा उपयोजितेची जोड मिळाली तेव्हा तंत्रज्ञान अस्तित्वात आले. मानवी मनाला जेव्हा सौंदर्य बोध होऊ लागला, तेव्हा अनेकविध कला अस्तित्वात आल्या. जसजशा या क्षमता वाढत गेल्या तसतसा कला, तंत्रज्ञान, विज्ञान, जादू यांचाही विकास होत गेला. मानवी संस्कृतीची धारा अधिकाधिक सधन आणि समृद्ध होत गेली. अशीच एक अत्यंत महत्वाची मानवी मनाची क्षमता म्हणजे श्रद्धा अथवा फेथ. धर्म म्हणजेच या श्रद्धेचा आविष्कार. आपल्या बुद्धीवर, निसर्गावर अथवा ईश्वरावर संपूर्ण भरोसा ठेवणे म्हणजेच श्रद्धा. श्रद्धेमुळे काहीही शक्य आहे अशी धारणा जवळजवळ सर्वच धर्मांच्या मुळाशी असलेली आपल्याला दिसते. या श्रद्धेवर आधारित जवळजवळ प्रत्येक धर्मामध्ये, पंथामध्ये, उपपंथामध्ये आपल्याला अनेक पुराणकथा, लोककथा आढळून येतात. लहान मुलांच्या चांदोबा मासिकामध्ये वाचलेल्या कथांचा इथे दाखला देता येईल. हुशार व शहाणा राजपुत्र. त्याच्या हरवलेल्या दोन भावांना चांगल्या वागण्याने व मन नियंत्रित ठेवल्याने कसा सोडवतो, कसा सिकंदर होतो अशी थीम असलेल्या अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. या राजपुत्राने आपल्या मोठ्या प्रवासात दुसऱ्यावर केलेले उपकार, त्याला मिळालेले वर, त्याने सात समुद्र पार करताना सात जंगले पार करताना मागे न वळून पाहता, मनावर ठेवलेले संपूर्ण नियंत्रण व या सर्वांमुळे त्याची झालेली जीत. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण वाचल्या असतील. सिंदबादच्या सफरींमध्येसुद्धा आपल्याला हाच धागा आढळतो. ही श्रद्धा दृढ करण्यासाठी सर्व परंपरांमध्ये सर्व धर्मांमध्ये अनेक तंत्रे आयुधे सांगितली आहेत. अर्थात या श्रद्धेचे अधिष्ठान आपले मनच आहे.
संत कबीर म्हणतात,
‘मोको कहा ढूंढे रे बंदे,
मै तो हू विश्वास विश्वास में’
ही श्रद्धा म्हणजे मनाचा रियाजच असतो. थोडेसे सोपे करून सांगायचे झाल्यास, आपण शास्त्रीय संगीताचे उदाहरण घेऊ शकतो. बोलणे, गाणे या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. परंतु या प्रवृत्तींना बांधून ठेवत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जेव्हा आपण आविष्कृत करतो तेव्हा अलौकिक असे गाणे, कला, एक्सप्रेशन गळ्यामधून उमटू लागतं. तीच कथा नृत्याची अथवा अन्य कलांची. आधुनिक काळामध्ये एकूणच दमन या प्रकाराकडे काहीशा संशयाने पाहिले जाते. जीवन हे फक्त आनंद उपभोगण्यासाठी आहे, अशी वृत्ती अशा उपहासामागे असते. परंतु वरील उदाहरण पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येईल की जर का आपण मनाचे नियंत्रण शिकलो, दमन शिकलो तर त्यातून श्रद्धेची वृद्धी व्हायला लागते. यासाठी विशिष्ट प्रकारची शिस्त व नियंत्रण हे सर्वच आवश्यक असतात.
‘तन को सौ- सौ बंदीशे
मन को लगी न रोक
तन की दो गज कोठरी
मन के तीनों लोक’
म्हणजेच काय तर या मनाला शिस्त लावून श्रद्धेचे कौशल्य अंगीकारून मानव नक्कीच अतिशय सफल असे जीवन जगू शकतो. तो पारमार्थिक होऊ शकतो. म्हणूनच भगवद्गीता म्हणते श्रद्धावान लभते ज्ञानं!
– डॉ. सुचित्रा नाईक
naiksuchitra27@gmail.com






