आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या दुखापतींचा पुरेपुर लाभ उठवत नोवाक जोकोविच यानं विम्बल्डनमध्ये आपला झेंडा फडकवत ठेवलाय. फायनलमध्ये किर्गिओस याला धूळ चारत जोकोविचनं अजिंक्यपद पटकावलं. तर, विमेन्स सिंगल्समध्ये कझाकस्तानची एलेना रेबाकिना ही अजिंक्य ठरली. ती तिच्या देशाची पहिलीच ग्रँड स्लॅम विजेती असली तरी तिच्या राष्ट्रीयत्वाचा वाद आता रंगताना दिसतोय.
रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल… ‘बिग थ्री’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या त्रिकुटामध्ये स्पर्धा आहे ती सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याची. गेलं वर्ष संपलं तेव्हा हे तिघेही प्रत्येकी २० ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरून होते. मात्र, नदालनं मेलबोर्न आणि पॅरीस जिंकून या दोघांना मागे टाकलं. फेडरर तर अनफिटच आहे, पण जोकोविचला ऑस्ट्रेलियात खेळायला मिळालं नाही, तर पॅरीसमध्ये क्वार्टर फायनलमध्ये नदालविरुद्धच पराभव पत्करावा लागला. मात्र आता त्यानं आपलं सातवं विम्बल्डन विजेतेपद पटकावलंय आणि करिअरमधलं २१वं ग्रँड स्लॅम… त्यामुळे ‘बिग थ्री’मधल्या रेसमध्ये तो आता दुसऱ्या क्रमांकावर गेलाय. त्यातच नदाल पुन्हा जायबंदी झाल्यामुळे जोकोविचचा ‘पाठलाग’ अधिक रंजक झालाय.
विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविच आणि नदाल यांची चुरस बघायला मिळेल, अशी आशा टेनिस रसिकांना होती. मात्र, किर्गिओससोबत एकही शॉट न खेळता त्यानं वॉक ओव्हर दिला. नदालच्या दुखापतीनं पुन्हा उचल घेतलीये आणि आता तो अमेरिकन ओपनपूर्वी तंदुरुस्त होतोय की नाही, अशी शंका उपस्थित झालीये. फेडरर जवळजवळ निवृत्तीच्या विचारापर्यंत पोहोचला असताना आणि जोकोविच विक्रमाची बरोबरी करण्याच्या तयारीत असताना ही दुखापत नदालला परवडणारी नाही. त्यामुळेच त्याच्या दुखापतीच्या घोषणेनं धक्का बसलेले चाहते आता तो लवकर फिट व्हावा अशी प्रार्थना करतायत. एकीकडे पुरुषांमध्ये जुने-जाणतेच हक्क गाजवत असताना महिला गटात मात्र नवी चॅम्पियन मिळालीये आणि तीदेखील नव्या देशाची…
वर्ल्ड नंबर ३ ओन्स जेब्युअर हिचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव करून एलेना रेबाकिना ही विम्बल्डनची चॅम्पियन झाली. हे तिचं पहिलं ग्रँड स्लॅम आणि तिच्या देशाचंही… ती कझाकस्तानकडून टेनिस खेळते. पण तिचा जन्म रशियामधला. शाळेत तिनं टेनिसचं अबकड गिरवलं ते रशियातच… तिथे तिचं अद्याप घर आहे. मात्र ५ वर्षांपूर्वी एलेना चांगल्या क्रीडा सुविधांसाठी कझाकस्तानला गेला आणि तिथलं नागरिकत्व घेतलं. आता ती आपलीच असल्याचा दावा रशियानं केलाय. असं करून रशियन टेनिस फेडरेशननं ऑल इंग्लंड टेनिस क्लबचा बदला घेतलाय. कारण रशियन खेळाडूंना विम्बल्डन खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र यामुळे एलेनाचं हे विजेतेपद नाहक आंतरराष्ट्रीय राजकारणात अडकलंय.
जोकोविचचा फॉर्म, नदालची दुखापत आणि एलेनाच्या देशाचा वाद यामुळे यंदाची विम्बल्डन गाजली. नदाल बाहेर पडल्यामुळे त्याचा चारही ग्रँड स्लॅम जिंकण्याची (कदाचित शेवटची) संधी हुकलीये. जोकोविचनं आपला फॉर्म आणि फिटनेस कायम ठेवला, तर तो सर्वाधिक ग्लँड स्लॅमचा विक्रम करण्याची शक्यता आता बळावली आहे. आगे आगे देखे होता है क्या ?
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संमिश्र असाच राहिला. आधीच्या टेस्ट सिरीजमधली राहिलेली पाचवी मॅच भारतानं गमावली. तर टी-२० सिरीज मात्र जिंकून घेतली. पहिल्या वन-डे मॅचमध्ये तर एखाद्या दुबळ्या संघासारखी क्रिकेटच्या जन्मदात्यांची आपण धुलाई केली. हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत कदाचित ही सिरीजही जिंकली असेल. पण कभी खुशी, कभी गम हे दौऱ्याच्या बाबतीत खरं आहेच, पण ते पहिल्या टेस्टच्या बाबतीतही खरं ठरलंय.
इंग्लंड दौऱ्याच्या सुरूवातीला झालेल्या टेस्टमध्ये पहिला अर्धा खेळ हा भारताच्या बाजुनं होता. पहिल्या डावात भारतानं ४१६ रन्स केल्यानंतर इंग्लंडला अवघ्या २८४ धावांमध्ये गुंडाळलं. दुसऱ्या डावात २४५ रन्सचा बरा स्कोअर टीम इंडियानं केला. मात्र, शेवटच्या डावात भारतीय गोलंदाजांची पिसं काढली ती जो रूट आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी… दोघांनी अनुक्रमे १४२ आणि ११४ रन्सची नाबाद खेळी केली आणि भारतानं दिलेलं आव्हान सहज पार केलं. इंग्लंडच्या या स्ट्रॅटेजीला ‘बाझबॉल’ असं गोंडस नाव देण्यात आलंय. या ‘बाझबॉल’ धोरणामुळेच पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊनही भारताला हा सामना गमवावा लागला. अननुभवी कर्णधारालाही यासाठी जबाबदार धरलं गेलं.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच जसप्रित बुमरावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. पहिल्या डावात शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेली विक्रमी खेळी असेल किंवा त्या डावात घेतलेल्या ५ विकेट असतील, हे बुमराचे वैयक्तिक विक्रम झाले. मात्र, कर्णधार म्हणून तो कमी पडला हे सामन्याचा निकालच सांगतोय. रोहित, राहुलनंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर आजतरी भारतीय निवड समितीकडे नाही हे स्पष्ट झालंय. अर्थात बुमराचं बरंच करिअर बाकी आहे. त्यामुळे त्यानं कर्णधारपदी आलेल्या अपयशाकडे दुर्लक्ष करून आपल्या बॉलिंगवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अर्थात त्यानं ते पहिल्या वन-डेमध्ये सिद्ध केलं. १९ रन्स देऊन ६ विकेट घेत त्यानं इंग्लंडचं कंबरडं मोडलं आणि भारतानं हा सामना १० विकेट्सनी जिंकला.
इंग्लंड दौरा सुरू असतानाच आता वाद सुरू झालाय तो ज्येष्ठ खेळाडूंनी मागितलेल्या विश्रांतीचा… एक-दोन नव्हे तर विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत अशा पाच खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आलीये. यावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रास्त टीका केलीये. ‘आयपीएलमध्ये तुम्ही कधी विश्रांती घेता का?’ असा परखड सवाल करत त्यांनी या खेळाडूंचे कान उपटलेत. हे खरंच आहे…
पैसा आणि प्रसिद्धी यासाठी आयपीएल खेळायचं आणि त्यातून दमल्यावर आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये विश्रांती मिळवायची हे योग्य नाही. देशासाठी खेळण्याला प्राधान्य द्यायचं की पैशासाठी खेळण्याला, याचा निर्णय या खेळाडूंना घ्यावाच लागेल; अन्यथा प्रेक्षकांनाही यांचे सामने बघायचे की नाही, यांना डोक्यावर घ्यायचं की नाही याचा विचार करायची वेळ येईल.
sportswriterap@gmail.com






