देशाच्या निर्यातीत 17.25 टक्क्यांनी वाढ; 28 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर झेप!
भारतीय वस्तूंच्या निर्यातीबाबत महत्त्वाची बातमी आहे. देशाची निर्यात 28 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये 17.25 टक्क्यांनी वाढ झाली असून, ती 39.2 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 28 महिन्यांतील सर्वोच्च पातळीसह दोन वर्षांतील निर्यातीच्या आकडेवारीतील ही सर्वात मोठी झेप आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये वार्षिक देशातील निर्यातीत 30.12 टक्के वाढ नोंदवली गेली होती.
व्यापार तूटही काहीशी घटली
देशाची आयातही ऑक्टोबरमध्ये ३.९ टक्क्यांनी वाढून, ६६.३४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२३ च्या याच महिन्यात म्हणजे वर्षभरापूर्वी ६३.८६ अब्ज डॉलरची आयात होती. गुरुवारी (ता.१५) केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यात व्यापार तूट म्हणजेच आयात आणि निर्यातीमधील फरक ऑक्टोबरमध्ये 27.14 अब्ज डॉलर इतका होता. या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण 20.78 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात व्यापार तूट 30.42 अब्ज डॉलर इतकी होती. त्यामुळे देशातील व्यापार तुट देखील कमी झाली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
आयातवाढीमागील प्रमुख घटक म्हणजे क्रुड ऑईल
कच्च्या तेलाच्या आयातीत १३.३४ टक्के वाढ झाल्यामुळे एकूण आयात वाढली आहे. कच्च्या तेलाची आयात ऑक्टोबरमध्ये वाढून, 18.2 अब्ज डॉलर झाली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात 16.1 अब्ज डॉलर इतकी झाली होती.
सोन्या-चांदीच्या आयातीतही घट
ऑक्टोबरमध्ये सोने आणि चांदीची आयात किंचित कमी होऊन, अनुक्रमे 7.13 अब्ज डॉलर आणि 0.33 अब्ज डॉलर झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, ती अनुक्रमे 7.23 अब्ज डॉलर आणि 1.31 अब्ज डॉलर इतकी होती. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर महिना निर्यातीसाठी खूप चांगला राहिला आहे. ही गती कायम राहिल्यास आम्ही या वर्षी निर्यातीचा (वस्तू आणि सेवा) 800 अब्ज डॉलरचा आकडा पार करू शकतो.
हे देखील वाचा – अनिल अंबानींच्या कंपनीला 2878 कोटींचा नफा; आधी होती कंपनी तोट्यात!
काय म्हणाले FIEO चे अध्यक्ष अश्विनी कुमार
FIEO चे अध्यक्ष अश्विनी कुमार म्हणाले आहे की, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात व्यापारी मालाच्या निर्यातीत दुहेरी अंकी वाढ हे निश्चितच एक अतिशय उत्साहवर्धक लक्षण आहे. व्यापार आघाडीवर निर्यातीचे पुनरुज्जीवन आणि वाढीचे सूचक आहे. एफआयईओ प्रमुख म्हणाले आहे की, कच्चे तेल आणि धातूच्या किमतीतील अस्थिरता तसेच सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मंदीनेही काही प्रमाणात निर्यातीचे मूल्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.