अनिल अंबानींच्या कंपनीला 2878 कोटींचा नफा; आधी होती कंपनी तोट्यात!
रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज (ता.१३) बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये आहेत. कंपनीचे शेअर्स आज 5 ट्क्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले. मात्र, कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल उत्कृष्ट राहिले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स पॉवरचा निव्वळ नफा 2,878.15 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीला 237.76 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
काय म्हटलंय कंपनीने?
रिलायन्स पॉवरने मंगळवारी शेअर बाजाराला माहिती दिली आहे की, समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 1,962.77 कोटी रुपयांवर घसरले. जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 2,116.37 कोटी रुपये होते. उपकंपनीच्या विसर्जनातून कंपनीला 3,230.42 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीने सांगितले आहे की, जुलै-सप्टेंबर तिमाहीत, रिलायन्स पॉवरने तिच्या उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडसाठी 3,872 कोटी रुपयांच्या गॅरेंटर दायित्वांची पूर्तता केली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेड ही भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची वीज निर्मिती आणि कोळसा संसाधन कंपनी आहे.
शेअर्सचा परतावा
आज (ता.१३) बुधवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 5 टक्के लोअर सर्किट असून, कंपनीचे शेअर्स 36.46 रुपयांवर आले आहेत. गेल्या पाच दिवसांत हा शेअर्स 20 टक्क्यांनी घसरला आहे. शेअरची किंमत 27 मार्च 2020 रोजी या 1.15 रुपये होती. मात्र, दीर्घकाळात शेअर्सने 274 रुपये (23 मे 2008 ची बंद किंमत) प्रचंड तोटा केला. म्हणजेच 2008 ते 2020 पर्यंत या शेअर्सला 99 टक्के तोटा झाला होता. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत 85 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत 4 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली. या शेअर्समध्ये एका वर्षात 62 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
हे देखील वाचा – गौतम अदानींची नवीन योजना; ‘या’ क्षेत्रात करणार 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक!
काय करते ही कंपनी
रिलायन्स पॉवर लिमिटेड ही पूर्वीची रिलायन्स एनर्जी जनरेशन लिमिटेड कंपनी रिलायन्स समूहाचा एक भाग आहे. तिची स्थापना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ऊर्जा प्रकल्प विकसित करणे, बांधणे, ऑपरेट करणे आणि देखरेख करण्यासाठी करण्यात आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)