फोटो सौजन्य: Social Media
ओला इलेक्ट्रिक देशात मागील काही वर्षांपासून उत्तम ई स्कूटर ऑफर करत आहे. ज्याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपंनीने आता आपल्या ई-बाईक्स देखील मार्केट उपलब्ध केल्या आहेत. पण एकीकडे कंपनीची वाहनं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जात आहे, तर दुसरीकडे ओला इलेक्ट्रिकची डोकेदुखी काही थांबायची नाव घेत नाही आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आलेली नोटीस. काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊया.
10 हजार लोकांच्या तक्रारीवरून ओलाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने ओलाला तिसरी नोटीस पाठवली आहे आणि तपासासाठी आवश्यक असलेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे देखील मागितली आहेत. CCPA नोटीसमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर दिलासा मिळावा यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात ओलाने केलेले अपील आधीच फेटाळण्यात आले आहे.
ओला इलेक्ट्रिकने CCPA कडून तिसरी नोटीस मिळाल्याबद्दल स्टॉक एक्सचेंजकडे माहिती दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने १० डिसेंबर रोजी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडला पुन्हा नोटीस पाठवली आहे आणि काही अधिक माहिती मागितली आहे.
यापूर्वी, १० डिसेंबर रोजी, सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकला नोटीसही बजावली होती. ऑक्टोबरमध्येही सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकला अशीच नोटीस पाठवली होती. ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि सेवांमध्ये कमतरता असल्याच्या तक्रारींची चौकशी झाल्यानंतर सीसीपीएने ही ठोस पाऊलं उचलली आहेत.
सीसीपीए नोटीसमधून दिलासा मिळावा यासाठी ओला इलेक्ट्रिकने कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केली होती. परंतु, ओलाची मागणी फेटाळून लावत कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ही नोटीस जबाबदार अधिकाऱ्याकडून सीसीपीएला पाठवली जात आहे. ओला इलेक्ट्रिक या नोटिसांना उत्तर देण्यास बांधील आहे. ओला इलेक्ट्रिक प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर देवदास म्हणाले की, तपास अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी मागण्याचा अधिकार आहे.
ज्या अधिकाऱ्याने नोटीस जारी केली आहे त्याला असे करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ओलाचा आहे. यासाठी किमान एक डायरेक्टर किंवा अॅडिशनल डायरेक्टर असावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कर्नाटक उच्च न्यायालय स्वतः जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या 10,466 तक्रारींची चौकशी करत आहे.
ओला इलेक्ट्रिकविरुद्धच्या प्राथमिक चौकशीत, सीसीपीएला ग्राहक संरक्षण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि सेवांचा अभाव या आरोपांमध्येही तथ्य असल्याचे आढळून आले आहे. ही चौकशी सीसीपीएच्या महासंचालक तपास पथकाकडून केली जात आहे.
ओलाला मिळालेल्या या तिसऱ्या सूचनेमुळे सोमवारी बाजार उघडल्यावर शेअर्सवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.