मनसे राज ठाकरे यांनी वसंत कानेटकर यांच्या सुख पाहता या पुस्तकासाठी मुखपृष्ठ रेखाटले (फोटो - एक्स)
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी वसंत कानेटकर यांच्या सुख पाहता या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. याबाबत राज ठाकरेंनी लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !
हे देखील वाचा : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा
पुढे त्यांनी लिहिलं की, घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.
काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत… pic.twitter.com/OUyXCR4Yto — Raj Thackeray (@RajThackeray) February 23, 2026
पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.
हे देखील वाचा : आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश
एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…, अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी ‘सुख पाहता’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आठवणी सांगितल्या आहेत.






