व्वा रे पठ्ठ्या..! थेट ओला इलेक्ट्रिक कंपनीशी भिडला; एकाच महिन्यात कंपनीचा शेअर रेकॉर्डब्रेक आपटला!
गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिकच्या बाईकबद्दल बऱ्याच तक्रारी येत आहेत. या तक्रारींना अनुसरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अनेक सवाल उपस्थित केले होते. ज्यामुळे काही दिवसांपुर्वी ओलाच्या उत्पादनानंतरची सेवा आणि गुणवत्तेवरून ओला इलेक्ट्रिक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्याशी त्याचे समाज माध्यमावर चांगलेच वाजले होते. एक्सवर त्यांचे भांडणे इतके गाजले की, या भांडणाचा जबरदस्त फटका ओला कंपनीला बसला आहे. गेल्या महिनाभरात कंपनीचा शेअर रेकॉर्डब्रेक आपटला आहे.
दोघांमधील वाद पुन्हा शिगेला
ओला इलेक्ट्रिक आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ओला कंपनीला ग्राहकांच्या तक्रारीवर काय कारवाई केली, याविषयीची विचारणा केली होती. त्याला कंपनीने उत्तर दिले. त्यानुसार, ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांच्या 10,644 तक्रारींमधील 99.1 टक्के तक्रारी सोडवल्याचा दावा केला आहे. या दाव्यावर कुणाल कामरा यांनी पुन्हा ओला कंपनीवर निशाणा साधला आहे.
“99 टक्के ग्राहकांचे समाधान केले म्हणजे 99 टक्के बाईक सुरू आहेत?” असा होतो का, असा चिमटा त्याने कंपनीला काढला आहे. या पोस्टला आतापर्यंत 1.3 दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. त्याने हा दावा सपशेल अमान्य केला आहे. उलट जे 1 टक्के ग्राहक आहेत, त्यांचा पण अनुभव शेअर करण्याची विनंती त्याने ओलाकडे केली आहे.
नेटिझन्सची ओलावर तिखट प्रतिक्रिया
या पोस्टनंतर नेटिझन्सनने ओलावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंपनीने तक्रारीवर कशी प्रक्रिया केली, ग्राहकांचे कसे समाधान केले यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांना कंपनीचा व्यवहार काही आवडलेला नसल्याचे समोर आले आहे. कंपनीने तक्रारी सोडवल्या नाहीत तर त्यांच्या तक्रारीच बंद केल्याचा आरोप काही नेटिझन्सने लावला आहे. तर कामरा याने या सर्व वादावर ओला इलेक्ट्रिकला चिमटा काढला आहे. ‘जर तक्रारच नोंदवण्यात येत नसेल तर तक्रार पण राहणार नाही’, असा हा मामला असल्याचा टोला त्याने लगावला आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअरला झटका
या वादानंतर ओला कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचा शेअर 25 टक्क्यांनी आपटला आहे. ओला इलेक्ट्रिकचा शेअर एनएसईवर 76 रुपये स्वागत मुल्यावर उघडला होता. त्यानंतर त्याने 157.40 अंकांची उच्चांकी कामगिरी बजावली होती. पण या वादाची झालर जसजशी वाढली. तसा कंपनीला मोठा फटका बसला आहे.
कंपनीच्या ऑफ्टर सेल सर्व्हिसवर अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात कॉमेडियन कुणाल कामरा हा पण एक आहे. दरम्यान या पडझडीनंतर कंपनीने ग्राहक आयोगाकडे जे उत्तर दाखल केले. त्यानंतर कंपनीचा शेअर 4.45 टक्क्यांनी वधारला. हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा घसरून 77.29 वर बंद झाला होता.