डिजिटल गुंतवणुकीतील फसवणूक कशी ओळखायची? ( सौजन्य - सोशल मीडिया )
आजचे भामटे आणि घोटाळेबाज केवळ बनावट फोन कॉलपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते सोशल मीडिया संदेश, टेलिग्राम ग्रुप्स, व्हॉट्सॲप मेसेज, आकर्षक मोबाईल ॲप्स किंवा अगदी हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढतात.
विशेषतः डिजिटल मालमत्ता क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने ओळखले पाहिजेत असे ५ प्रमुख धोक्याचे इशारे खालीलप्रमाणे आहेत:
कमी किंवा कोणताही धोका न पत्करता निश्चित नफा किंवा अत्यंत अल्प कालावधीत अवाजवी परताव्याचे आश्वासन दिले जात असेल, तर तो पहिला आणि सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की, इतर कोणत्याही बाजार-संलग्न गुंतवणुकीप्रमाणेच डिजिटल मालमत्तांमध्येही चढ-उतार होतात आणि त्यात जोखीम असते. घोटाळेबाज बहुदा लोकांना विचार न करता तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अशा नफ्याचे अमिष दाखवतात. कोणत्याही आकर्षक दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी ती योजना काय आहे, ती देणारी संस्था कोणती आहे आणि तिची अधिकृतता पडताळता येते का, याचा सखोल अभ्यास करा.
जर तुम्हाला व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सोशल मीडिया किंवा ईमेलवर अनोळखी व्यक्तीकडून गुंतवणुकीची थेट ऑफर आली, तर त्वरित सावध व्हा. स्वतःला ‘गुंतवणूक तज्ज्ञ’ किंवा नामांकित कंपनीचा ‘प्रतिनिधी’ सांगून लोक तुमचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा प्रस्थापित ब्रँड्सच्या नावाचा किंवा लोगोचा गैरवापर करून बनावट प्रोफाईल तयार केले जातात. अशा कोणत्याही अनपेक्षित संदेशांमधील संपर्क क्रमांकावर किंवा लिंकवर विश्वास न ठेवता, संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करा.
एखादे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲप अत्यंत व्यावसायिक आणि आकर्षक दिसत असले, तरी ते अधिकृत असेलच असे नाही. गुन्हेगार कायदेशीर आणि नामांकित आर्थिक सेवांशी जुळणाऱ्या बनावट ॲप्स आणि वेबसाईट तयार करतात. काही बनावट ॲप्स तर सुरुवातीला गुंतवणूकदाराचा विश्वास जिंकण्यासाठी आभासी नफा दाखवतात आणि लहान रकमा काढण्याची परवानगी देतात. एकदा युजरचा विश्वास बसला की त्याला मोठी रक्कम जमा करायला लावून पसार होतात. त्यामुळे कोणत्याही ॲपला डाऊनलोड करताना केवळ ‘गूगल प्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपल ॲप स्टोअर’ सारख्या अधिकृत स्त्रोतांचाच वापर करा आणि वेबसाईटची युआरएल काळजीपूर्वक तपासा.
पासवर्ड, ओटीपी (वन टाईम पासवर्ड), प्रायव्हेट की किंवा वॉलेटचा तपशील मागणे हा एक अत्यंत गंभीर धोक्याचा इशारा आहे. घोटाळेबाज बहुदा ‘कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी’ असल्याचे भासवतात. तुमचे खाते ब्लॉक झाले आहे, ब्लॉक काढण्यासाठी किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी OTP ची गरज आहे, असे सांगून तुमची फसवणूक करतात. कोणतीही अधिकृत संस्था किंवा प्लॅटफॉर्म कधीही तुमच्याकडे गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे कोणीही कितीही मोठा दावा केला, तरी आपली संवेदनशील माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
आर्थिक फसवणूक करताना घोटाळेबाजांचे मुख्य हत्यार म्हणजे ‘तात्कालिकता’ (Urgency) निर्माण करणे हे असते. “लगेच गुंतवणूक करा नाहीतर ही संधी हुकेल”, “पैसे काढण्यासाठी आताच अतिरिक्त कर भरा”, किंवा “सवलत संपण्यापूर्वी निर्णय घ्या”, अशा प्रकारचा दबाव तुमच्यावर आणला जातो. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ न देता लगेच निर्णय घेण्यास भाग पाडते, तेव्हा तिथे फसवणुकीची शक्यता सर्वाधिक असते.






