Domestic Institutional Investors: देशातील सर्वात मोठ्या DII ला 2 महिन्यांत 1.45 लाख कोटींचे नुकसान! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Domestic Institutional Investors Marathi News: शेअर बाजारातील अलिकडच्या घसरणीमुळे देशातील सर्वात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) लाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या वर्षातील फक्त दोन महिन्यांत, एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये १.४५ लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये एलआयसीच्या ३१० स्टॉकच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य १४.९ लाख कोटी रुपये होते, परंतु फेब्रुवारीच्या अखेरीस ते १३.४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झाले.
कोविडनंतर स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे. एलआयसीने गुंतवणूक केलेल्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओला सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्सच्या यादीत आयटीसी, एलआयसी आणि एसबीआय हे सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत.
आयटीसीमध्ये एलआयसीचा दुसरा सर्वात मोठा हिस्सा आहे आणि या शेअरमध्ये १८ टक्के घसरण झाल्यामुळे एलआयसीला सुमारे १७,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एलआयसीचा अनुक्रमे ४.७५ टक्के आणि १०.५८ टक्के हिस्सा असलेल्या टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही घसरण झाली. यामुळे एलआयसीच्या पोर्टफोलिओला अनुक्रमे १०,५०९ कोटी रुपये आणि ७,६४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बैंकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये, एसबीआय (९.१३% हिस्सा) आणि आयसीआयसीआय बँक (७.१४% हिस्सा) यांचा हिस्सा घसरल्याने ८,५६८ कोटी रुपयांचा आणि एलआयसीला ३,१७९ कोटी रुपयांचा तोटा झाला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स ३०.५ टक्के घसरले, ज्यामुळे एलआयसीला ३,५४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एल अँड टी, एचसीएल टेक, एम अँड एम, जिओ फायनान्शियल, आयसीआयसीआय बँक, अदानी पोट्र्ट्स आणि जेएसडब्ल्यू एनर्जी यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. ३५ शेअर्स १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीने शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या एकूण ३१० कंपन्यांमध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा खरेदी केला आहे. अशा परिस्थितीत, बाजारातील अलिकडच्या घसरणीमुळे, एलआयसीच्या पोर्टफोलिओवर मोठा परिणाम दिसून येत आहे. वित्तीय, आयटी, औद्योगिक समभागांमध्ये घसरण झाल्यामुळे एलआयसीच्या इक्विटी पोर्टफोलिओवर वाईट परिणाम झाला आहे. यावर्षी किमान ३५ असे शेअर्स आहेत जिथे एलआयसीला किमान १,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय कार्ड्सच्या शेअर्सनी बाजारातील घसरणीला रोखले आणि एलआयसीला नफा मिळवून दिला.