क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप (Photo Credit- X)
रविवारी ढाका येथे पार पडलेल्या बीसीबीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंझुरुल इस्लाम याला बांगलादेश क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही भूमिकेसाठी कायमचे ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात आले आहे. २०२० मध्ये त्याची बांगलादेश महिला संघाच्या मुख्य निवडकर्ता पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, जहाआरा आलमच्या तक्रारीनंतर स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये इस्लामवर ठपका ठेवण्यात आला आहे.
Bangladesh take big step over sexual harassment allegations by ex-women’s cricket team skipper Jahanara Alam#Bangladesh https://t.co/gtUSHKOlGw — CricketNDTV (@CricketNDTV) February 23, 2026
जहाआरा आलमने एका मुलाखतीत मंझुरुल इस्लामच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला होता. तिच्या आरोपांनुसार मंझुरुल इस्लाम परवानगीशिवाय खांद्यावर हात ठेवत असे. तो तिच्या मासिक पाळीबद्दल (Periods) प्रश्न विचारून तिला मानसिक त्रास देत असे. हस्तांदोलन करण्याऐवजी तो संघसहकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करायचा. जहाआराने त्याचे अयोग्य प्रस्ताव फेटाळल्यामुळे त्याने तिचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप तिने केला आहे.
बीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “स्वतंत्र चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारावर मंझुरुल इस्लामला कोणत्याही क्रिकेटशी संबंधित उपक्रमातून प्रतिबंधित करण्यात आले आहे. बोर्ड समितीच्या शिफारशींचे अधिक सखोल पुनरावलोकन करत असून, गरज भासल्यास भविष्यात त्याच्यावर अधिक कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.”
जहाआरा आलम ही बांगलादेश महिला क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहे. तिने ५२ एकदिवसीय सामन्यांत ४८ विकेट्स आणि ८३ टी-२० सामन्यांत ६० विकेट्स घेतल्या आहेत. या प्रकरणामुळे बांगलादेश क्रिकेटमधील अंतर्गत व्यवस्था आणि महिला खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






