म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! (फोटो सौजन्य-Gemini)
सर्वांत कमी किमतीचे घर पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द येथे असून या घराची किमत ३१ लाख रुपये आहे तर, सर्वात महागडे घर ताडदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असून या घराची किमत ८ कोटी रुपये आहे. अर्जदाराला योजनेनुसार एक लाख रुपयांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
नवीन रेडी रेकनरनुसार घरांच्या किमती आकारण्यात आल्या आहेत. यामुळे सदनिकांच्या किंमती बोड्या वाढल्या आहेत. तरीही सदनिकांच्या मार्केट रेटपेक्षा कमी किमती आहेत. या योजनेला खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना नियमानुसार पाच वर्षे घराची विक्री करता येत नाही. त्याचप्रमाणे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील विजेत्यांनाही घराच्या विक्रीसाठी पाच वर्षाची अट घातली आहे. तसेच अर्जदारांना डोमेसाईल प्रमाणपत्र देखील बंधनकारक असणार आहे. अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या घरांचा देखभाल खर्च म्हाडाने आपल्या तिजोरीतून भरला आहे. या खर्चाचा समावेश घरांच्या किमतीत करण्यात आल्यामुळे या योजनेतील घरांच्या किमती वाढल्या आहेत. रेडी रेकनर दरामुळेही किमती वाढल्या आहेत.
अर्जदाराने मनपसंत घराची निश्चिती केल्यानंतर घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांत ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.
अर्जदाराने ४८ तासांच्या आत १० टक्के रक्कम न भरल्यास घरावरील दावा रद्द होणार आहे. तसेच अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे.
अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीत रक्कम न भरल्यास आणखी ९० दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे.
तरीही पैसे न भरल्यास घराचे वितरण रद्द करण्यात येईल. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर एखाद्या अर्जदाराने घर नाकारले तर घराच्या विक्री किमतीच्या १ टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अर्जदाराला परत करण्यात येईल.






