गोल्डमन सॅक्सने 'या' कंपनीचे ७.२८ लाख शेअर्स केले खरेदी, शेअर्स ४ टक्क्याने वाढले (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
BSE Share Marathi News: आघाडीच्या स्टॉक एक्सचेंज बीएसईचे शेअर्स आज गुरुवारी ४% पर्यंत वाढून ५८५० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठी बातमी आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणूक कंपनी गोल्डमन सॅक्सने खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे आघाडीच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये हिस्सा मिळवला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बल्क डील डेटानुसार, गोल्डमन सॅक्स (सिंगापूर) प्रा. लि. ने बुधवारी खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे BSE लिमिटेडने ७.२८ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. गेल्या चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबताना दिसत आहे. निफ्टी निर्देशांक अजूनही २२८०० च्या पातळीवर आहे. सध्या, २२८०० ची पातळी एक मजबूत आधार पातळी म्हणून काम करत आहे.
बुधवारी झालेल्या या मोठ्या व्यवहाराचा परिणाम गुरुवारी बीएसई लिमिटेडच्या शेअर्सवर दिसून आला. आजच्या इंट्राडे सत्रात, बीएसई लिमिटेडच्या शेअर्समध्ये ४% वाढ झाली आहे ज्यामुळे बीएसई लिमिटेडचे शेअर्स ५८४५ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.
गेल्या बुधवारीही बीएसई लिमिटेडच्या शेअर्समध्ये ८.५ टक्क्यांची जोरदार वाढ झाली. म्हणजेच, गेल्या २ व्यापारी दिवसांत बीएसई लिमिटेडचे शेअर्स १३ टक्यांनी वाढले आहेत.
बीएसई शेअर्स आणि गोल्डमन सॅक्स यांच्या व्यवहारातील माहितीनुसार, गोल्डमन सॅक्सने बीएसई शेअर्स सरासरी ५५०४ रुपये प्रति शेअर दराने खरेदी केले आहेत, या संपूर्ण व्यवहाराचे एकूण मूल्य ४०१.१९ कोटी रुपये इतके आहे.
बीएसई स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, जानेवारी २०२५ मध्ये या स्टॉकमध्ये ०.४ टक्क्यांची थोडीशी घसरण दिसून आली होती, परंतु आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यात या स्टॉकने १० ते २० टक्के नफा दिला आहे, तर गेल्या १ वर्षात या स्टॉकच्या किमतीत १४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६१३३ रुपये आहे तर ५२ आठवड्यांचा नीचांक १९४१ रुपये आहे.
डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत बीएसई लिमिटेडने निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ नोंदवली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ₹१०८.२ कोटींच्या तुलनेत ₹२२० कोटींवर पोहोचली. स्टॉक एक्स्चेंजने तिसऱ्या तिमाहीत ₹८३५.४ कोटी इतका उच्चांकी तिमाही महसूल देखील गाठला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ₹४३१.४ कोटींपेक्षा ९४ टक्क्यांनी जास्त आहे. या तिमाहीत बीएसईवरील सरासरी दैनिक उलाढाल ₹६,८०० कोटी होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ₹६,६४३ कोटींपेक्षा किंचित जास्त आहे.