
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने (आयजीआय) गोव्यातील पणजी येथील ‘ताज सिदादे दे गोवा’ येथे आयोजित केलेल्या IGI D शोच्या 23व्या आवृत्तीची यशस्वी सांगता झाली. ‘ब्लूप्रिंट ऑफ ब्रिलियन्स’ या संकल्पनेवर आधारित 11 ते 13 जूनदरम्यान आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताच्या हिरे आणि दागिने उद्योगासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. खरेदीदार-विक्रेता मेळाव्यांपैकी सर्वाधिक प्रभावशाली व्यासपीठांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाने पुन्हा आपले स्थान अधोरेखित केले. देशभरातील 45 हिरे उत्पादक आणि 180हून अधिक रिटेलर्स एकाच छताखाली एकत्र आले होते. व्यावसायिक देवाणघेवाण आणि अर्थपूर्ण वाढीसाठी अनुकूल असे उत्साही व्यावसायिक वातावरण या निमित्ताने निर्माण झाले.
23व्या आवृत्तीत सेन्को गोल्ड अँड डायमंड्स, जॉय अलुक्कास आणि रेवा डायमंड बाय पीएनजी यांसारख्या आघाडीच्या रिटेल ब्रँड्सचा सहभाग होता . या शिवाय, भारतातील उत्कृष्ट हिरेदागिन्यांच्या कारागिरीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक उत्पादकही सहभागी झाले होते. या प्रदर्शनात हजारो प्रीमियम दागिने सादर करण्यात आले. यामध्ये कॉचर कलेक्शन्स, आकर्षक आकारांच्या हिऱ्यांच्या कलाकृती तसेच आधुनिक ग्राहकांच्या पसंतीच्या दागिन्यांचा समावेश होता. त्यामुळे खरेदीदारांना उद्योगातील सर्वोत्तम निर्मितींचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. उत्पादकांसाठी IGI D शो हे आपली उत्कृष्ट निर्मिती थेट जाणकार किरकोळ खरेदीदारांसमोर सादर करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरले, तर किरकोळ विक्रेत्यांना सर्टिफाइड कलेक्शन्स, विश्वासार्ह पुरवठादारांशी संबंध आणि प्रत्यक्ष व्यावसायिक चर्चांची संधी मिळाली.
दागिन्यांच्या अंतिम मूल्यमापन सेवांचा भाग म्हणून मेटल क्वालिटी चेक ही सेवा आयजीआयकडे यापूर्वीपासून उपलब्ध असली तरी, आता संस्थेकडून या क्षमतेवर अधिक भर देण्यात येत आहे. आयजीआयच्या मेटल क्यूसी प्रक्रियेच्या माध्यमातून तयार दागिन्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये कारागिरी, वापरयोग्यता, पृष्ठभागावरील फिनिश, उपयुक्तता, सेटिंग, प्लेटिंगमधील सुसंगतता, वजन व मापे तसेच स्टँपिंग किंवा कोरीव कामाची स्पष्टता यांचा समावेश असतो. दागिने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांमधील दिसणाऱ्या किंवा कार्यक्षमतेशी संबंधित त्रुटी या सेवेच्या माध्यमातून उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांना ओळखता येतात. त्यामुळे उत्पादनाच्या एकूण गुणवत्तेबाबत अधिक विश्वास निर्माण होण्यास मदत होते.
23व्या आवृत्तीबाबत बोलताना आयजीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबल सीईओ तेहमास्प प्रिंटर म्हणाले, “IGI D शो हा नेहमीच उद्योगातील व्यावसायिक संबंध आणि व्यवसायाच्या गुणवत्तेला नवी उंची देणारा उपक्रम राहिला आहे आणि यंदाची आवृत्तीही त्याला अपवाद नव्हती. ‘ब्लूप्रिंट ऑफ ब्रिलियन्स’ ही केवळ संकल्पना नव्हती, तर गोव्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब होती. भारतातील सर्वोत्तम उत्पादक आणि रिटेलर्स केवळ व्यापारासाठी नव्हे, तर विकास,नवकल्पना आणि उद्योगाची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी एकत्र येतात, असे व्यासपीठ उपलब्ध करून देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
यंदाच्या आवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आयजीआयने सादर केलेला व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) अनुभव. ‘माइन्स-टू-मार्केट’ या संकल्पनेवर आधारित या अनुभवातून हिरेदागिन्यांच्या किरकोळ विक्री क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले. किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या स्टोअरमधील सादरीकरण अधिक आकर्षक करता यावे, ग्राहकांशी संवाद अधिक प्रभावीपणे साधता यावा आणि खरेदीविषयीचा विश्वास वाढवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. व्हीआर अनुभवाविषयी बोलताना तेहमास्प प्रिंटर म्हणाले, “व्हीआर तंत्रज्ञानामुळे किरकोळ विक्रेत्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक स्पर्धेत महत्त्वाचा फायदा मिळू शकतो आणि दागिने विक्रीतील अनुभवाधारित तंत्रज्ञानाच्या भविष्यातील दिशेचेही ते द्योतक आहे. दागिने विक्रीचा अनुभव अधिक प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्याच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे, असा आमचा विश्वास आहे.”
यंदा प्रदर्शनस्थळी मोठ्या प्रमाणावर नव्या ऑर्डर्स, नूतनीकरण झालेल्या पुरवठा भागीदाऱ्या आणि महत्त्वपूर्ण व्यावसायिक चर्चांची उत्साहवर्धक लगबग पाहायला मिळाली. या चर्चा आणि व्यावसायिक संधींचा प्रभाव कार्यक्रम संपल्यानंतरही कायम राहणार आहे. 45 उत्पादक आणि 180हून अधिक रिटेलर्स एकाच छताखाली एकत्र आल्याने आयजीआय डी शोने आपले मूळ उद्दिष्ट साध्य केले. व्यापार क्षेत्राला प्रत्यक्ष आणि मोजता येईल अशी व्यावसायिक वाढ मिळवून देणारे दर्जेदार व्यावसायिक संबंध निर्माण करण्यास या व्यासपीठामुळे चालना मिळाली.
सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुवंकर सेन म्हणाले, “ IGI D शो हा आमच्या वार्षिक दिनदर्शिकेतील सर्वाधिक परिणामकारक कार्यक्रमांपैकी एक आहे. सर्टिफाइड आणि निवडक कलेक्शन्स सादर करणाऱ्या 45 आघाडीच्या प्रदर्शकांशी एकाच ठिकाणी संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे आमच्या सोर्सिंग प्रक्रियेतील अनेक महिन्यांचा वेळ वाचतो. गोव्यातील यंदाची आवृत्ती विशेष ठरली. बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षांशी सुसंगत अशा नाविन्यपूर्ण डिझाइन्स आम्हाला येथे पाहायला मिळाल्या. या प्रदर्शनातून आम्ही नव्या कलेक्शन्ससह अधिक मजबूत व्यावसायिक भागीदाऱ्या घेऊन परतत आहोत.”
जॉस अलुक्कासचे व्यवस्थापकीय संचालक वर्गीस अलुक्का म्हणाले, “IGI D शोचे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमामुळे दर्जेदार व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. रिटेलर्स म्हणून आम्ही विश्वासार्ह उत्पादक, आयजीआय-सर्टिफाइड कलेक्शन्स आणि बाजारपेठेतील बदल समजून घेणारे भागीदार शोधत असतो. हे सर्व या व्यासपीठावर तीन दिवसांत उपलब्ध होते. 23वी आवृत्ती आमच्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक फलदायी ठरली आहे.”
रिलायन्स ज्वेल्सचे मर्चेंडायझिंग प्रमुख मितेश दुसारा म्हणाले, “रिलायन्स ज्वेल्समध्ये आम्ही ग्राहकांना विश्वास, उत्कृष्ट कारागिरी आणि नावीन्य यांची सांगड घातलेली डिझाइन्स देण्यासाठी कटिबद्ध आहोत. IGI D शोने आम्हाला प्रमाणित कलेक्शन्सचा शोध घेण्यासाठी, आघाडीच्या उत्पादकांशी संवाद साधण्यासाठी आणि आजच्या ग्राहकांच्या पसंतीशी सुसंगत नव्या प्रवाहांची ओळख करून घेण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनुभवाधारित व्हीआर तंत्रज्ञानाचा समावेश विशेष उल्लेखनीय ठरला. डिजिटल अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांशी अधिक प्रभावी संवाद कसा साधता येऊ शकतो आणि दागिने विक्रीचा अनुभव कसा बदलू शकतो, याची झलक त्यातून पाहायला मिळाली. या अनुभवातून मिळालेल्या जाणीवांचे रूपांतर आम्ही अधिक निवडक कलेक्शन्स आणि देशभरातील ग्राहकांसाठी अधिक समृद्ध खरेदी अनुभवांमध्ये करू, अशी अपेक्षा आहे.”
या कार्यक्रमामध्ये भारताच्या हिरे आणि दागिने उद्योगाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन मान्यवर दिग्गजांचा विशेष सत्कारही करण्यात आला. जीजेसीचे संस्थापक अध्यक्ष अशोक मिनावाला, एमराल्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन तसेच जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांना त्यांची दूरदृष्टी, उद्योगहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल आणि भारताला जागतिक हिरे व दागिने उद्योगातील प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्यात दिलेल्या दीर्घकालीन योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
सन्मान स्वीकारताना अशोक मिनावाला म्हणाले, “आयजीआय डी शोसारखी व्यासपीठे आपल्या उद्योगाच्या विकासकथेला बळ देणारा आधारस्तंभ आहेत. उत्पादक आणि रिटेलर्स विश्वास आणि गुणवत्तेच्या वातावरणात एकत्र येतात, तेव्हा त्यातून केवळ व्यवहारच नव्हे तर दीर्घकालीन संधी निर्माण होतात. या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभारी असून उद्योगाच्या प्रगतीसाठी माझे योगदान पुढेही सुरू राहील.”
सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना किरीट भन्साळी म्हणाले, “भारताचा दागिना उद्योग मोठा पल्ला गाठून आज या टप्प्यावर पोहोचला आहे. आयजीआय डी शोसारखे कार्यक्रम आपल्या संपूर्ण उद्योग परिसंस्थेच्या सामूहिक ताकदीचे प्रतीक आहेत. प्रमाणित आणि दर्जेदार दागिन्यांवर दिला जाणारा भर हीच बाजारपेठेची भविष्यातील दिशा आहे आणि या प्रवासात आयजीआयने नेहमीच विश्वासार्ह भागीदाराची भूमिका निभावली आहे.”
तीन दिवस चाललेल्या चर्चांमधून प्रमाणन, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास हे आजच्या बदलत्या बाजारपेठेत शाश्वत विकासासाठी अपरिहार्य घटक बनले असल्याचे अधोरेखित झाले. 23व्या आवृत्तीची सांगता होत असताना आयजीआय डी शो पूर्वीपेक्षा अधिक सक्षम स्वरूपात उभा आहे. व्यापारवृद्धीला चालना देणारे व्यासपीठ, उद्योगातील योगदानाचा गौरव करणारा मंच आणि भारताच्या हिरे व दागिने उद्योगाच्या भविष्यातील दिशादर्शक म्हणून या उपक्रमाची ओळख अधिक दृढ झाली आहे.
Multibagger Stock: ‘हा’ शेअर बनला रॉकेल… 9 रुपयांवरुन थेट 600 रुपयांवर, एक लाखाचे झाले तब्बल 68 लाख