1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक ( सौजन्य - सोशल मीडिया )
प्रवाशांच्या तिकिटांसोबत त्यांची ओळख आणि पात्रतेची कागदपत्रे तपासली जातील. विशेषतः जर तुम्ही सवलत, विशेष आरक्षण कोटा, ई-पास किंवा प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर PTO अशी तिकीट बुक करत असाल. तर त्यासोबत तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
भारतीय रेल्वेमध्ये, ‘प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर’ PTO हे पात्र रेल्वे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जारी केलेले सवलतीचे प्रवासी व्हाउचर आहे. याद्वारे, ते सामान्य प्रवासी भाड्याच्या एक तृतीयांश म्हणजेच 33% दराने रेल्वे तिकीट खरेदी करू शकतात.
मध्य रेल्वे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान, रेल्वे कर्मचारी प्रवाशाचे तिकीट वैध आहे की नाही आणि त्या तिकिटावर प्रवास करणारी व्यक्ती पात्र आहे की नाही, याची चोख पडताळणी करतील. याचा अर्थ, यापुढे केवळ तुमच्याकडे तिकीट आहे की नाही हे फक्त तपासलं जाणार नाही तर तिकीट मिळवण्यासाठी आधार आणि आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे की नाही, हे देखील तपासलं जाण्याची शक्यता असते.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी CPRO डॉ. स्वप्निल नीला यांच्या मते, सवलत किंवा विशेष आरक्षण कोट्याअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आवश्यक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. जर एकाच तिकिटावर अनेक प्रवासी प्रवास करत असतील, तर रेल्वेच्या नियमांनुसार किमान एका प्रवाशाकडे आवश्यक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तिकीट योग्य प्रवाशालाच दिले आहे की नाही हे तपासण्यासाठी रेल्वे कर्मचारी तपासणीदरम्यान या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
रेल्वेच्या मते, तपासणीदरम्यान आवश्यक मूळ कागदपत्र न सापडल्यास, लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी वैध तिकिटाशिवाय प्रवास करत आहेत असे मानले जाऊ शकते. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे तिकीट असले तरी, कागदपत्रे नसल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, जर तिकीट सवलत किंवा विशेष कोट्याअंतर्गत खरेदी केले असेल, तर प्रवास करण्यापूर्वी कागदपत्रे नक्की तपासा.
या विशेष मोहिमेत अनारक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार आहे. रेल्वे तिकीट परीक्षक आवश्यक असल्यास टीटीई ॲपच्या मदतीने तिकीट सत्यापित आणि तपासू शकतात. याचा अर्थ असा की तुमच्याकडे आरक्षित सीट नसली आणि तुम्ही अनारक्षित तिकिटावर प्रवास करत असाल तरीही तिकीटाची वैधता तपासली जाऊ शकते.
रेल्वेच्या मते, प्रवासादरम्यान ओळखीसाठी अनेक कागदपत्रे वैध असतात. यामध्ये…
1. आधार कार्ड
2. मतदार छायाचित्र ओळखपत्र
3. पासपोर्ट
4. पॅन कार्ड
5. ड्रायव्हिंग लायसन्स
६. केंद्र किंवा राज्य सरकारचा क्रमांक असलेले फोटो ओळखपत्र
७. विद्यार्थ्याचे फोटो ओळखपत्र
८. फोटो असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक
९. लॅमिनेटेड फोटो असलेले क्रेडिट कार्ड
लक्षात ठेवा की, ज्या प्रवाशांच्या तिकिटांसाठी पात्रतेचे निकष आहेत, त्यांच्यासाठी केवळ कोणतेही ओळखपत्र असणे पुरेसे ठरणार नाही. आवश्यकतेनुसार तुम्हाला पात्रतेची कागदपत्रे दाखवावी लागतील.
मध्य रेल्वेच्या मते, या तपासणी मोहिमेचा उद्देश तिकीट आणि आरक्षणाशी संबंधित अनियमिततांना आळा घालणे हा आहे. रेल्वे विशेषतः महसुलाचे नुकसान टाळणे, आरक्षणाचा गैरवापर रोखणे आणि सवलती, पास किंवा इतर लाभांचा फसवणुकीने होणारा वापर रोखण्यावर लक्ष केंद्रित करेल.
करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख






